आरे कॉलनीत बिबट्याचा धुमाकूळ

गोरेगाव - बिबट्याने धुमाकूळ घातल्याने मुंबईच्या आरे कॉलनीतल्या रॉयलपाम परिसरातले रहिवासी चांगलेच धास्तावले आहेत. काही दिवसांंपूर्वी या भागात बिबट्या एका चिमुकल्याला ओढून नेत होता. मात्र आईने झुंज देत बिबट्याच्या तावडीतून मुलाची सुटका केली. या भागात अशाच प्रकारची दुसरी एक घटना आता समोर आली आहे. या वेळी बिबट्या आरे कॉलनीतल्या इम्पिरियल पॅलेस या इमारतीतल्या पार्किंगच्या जागेत शिरून एका कुत्र्याचा पाठलाग करत होता. त्याचा व्हिडिओ देखील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.त्यावेळी तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने कुत्रा आणि बिबट्याला पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या बिबट्याने सुरक्षा रक्षकावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण हातात काठी असल्याने आपले प्राण वाचल्याचे सुरक्षा रक्षकाने सांगितले. काहीवेळानंतर जेव्हा कुत्रा तिथून निघून गेला त्यावेळी बिबट्याही तिथून निघून गेला. पण कधी खाण्याच्या शोधात तर कधी पाण्याच्या शोधात बिबट्या इथे येत असल्याने आता या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करण्याची देखील भीती वाटत असल्याची प्रतिक्रिया सुरक्षा रक्षकाने दिली आहे.

Loading Comments