Advertisement

ये दिल है मुश्किल जीना यहाँ...

मुंबईत जगणं अवघड होतानाच मरण मात्र स्वस्त झाल्याचं सातत्यानं समोर येतंय. मग ती एल्फिन्स्टन दुर्घटना असो, कमला मिल आग असो, घाटकोपर विमान दुर्घटना असो वा अगदी गार्डनमध्ये फिरायला गेल्यास मधमाशी चावून येणारं मरण असो. याच परिस्थितीमुळं एकदा बाहेर पडलेलं आपलं जीवाभावाचं माणूस परत कधी घरी येणार याकडंच घरी असणाऱ्यांचे डोळे लागलेले असतात.

ये दिल है मुश्किल जीना यहाँ...
SHARES

ये दिल है मुश्किल जीना यहाँ, जरा हटके, जरा बचके
ये बाॅम्बे मेरी जान!

मुंबई म्हणजे मुंबईकरांची शान आणि जान. मुंबईत कुणीही उपाशी राहत नाही, मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मुंबई आपल्यात सामावून घेत आपलसं करते. त्यामुळं मराठी असो वा अमराठी प्रत्येकासाठी मुंबई मेरी जान असते. पण आता याच मुंबईत जगणं मुंबईकरांसाठी दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. कारण सकाळी घरातून बाहेर पडलेली व्यक्ती रात्री घरी पोहोचेल की नाही याची खात्रीच कुणाला राहिलेली नाही.


भिती वाढतच चालली

अपघात, बाॅम्बस्फोट, स्फोट, आग अशा गोष्टींची भीती मुंबईकरांच्या मनात सारखी असते. पण आता त्यात पावसाची, उघड्या मॅनहोलची, चेंगराचेंगरीची, रस्ता खचण्याची, इमारत कोसळण्याची, भिंत पडण्याची, नाल्यात पडण्याची अशा अनेक ना अनेक कारणांची भर पडतच चालली आहे. या भीतीची कमी म्हणून की काय आता रस्त्यावरून चालणाऱ्या झाडांचीही भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. कारण गेल्या काही वर्षात झाडं अंगावर पडूनही मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागत आहे. अहो, मधमाशी चावल्यानंही जीव जातो हो आज काल. 

वरून पडणारा पाऊस, वीज मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवत होतीच; पण आता चालताना मुंबईकरांना पायाखालचा रस्ता बघत चालताना वरही लक्ष द्याव लागत आहे. न होवो वरून एखादं विमान, हेलिकाॅप्टर पडायचं, काहीच खरं नाही.


यंत्रणा सपशेल फेल 

नैसर्गिक आपत्ती-संकटं अपघात एकीकडं, तर दुसरीकडं जीवघेणे आजार. हो, लेप्टो, डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लू असे एक ना अनेक आजार मुंबईत डोकं वर काढतात आणि मुंबईकरांना आपल्या कवेत घेतात. नैसर्गिक आपत्ती-संकटं, बाॅम्बस्फोट, दंगली रोखण्यात यंत्रणा कमी पडतातच. पण जे सहजगत्या होऊ शकत, जे यंत्रणांच्या हातात आहे त्या साथीच्या आजारांवर नियंत्रण आणण्यात, मुंबई स्वच्छ, सुंदर करत मुंबईकरांना आजारापासून दूर पडण्यातही यंत्रणा सपशेल फेल ठरताना दिसतात.


दुर्घटनेतून बोध  नाही

२९ सप्टेंबर हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकणार नाहीत. या दिवशी एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर जे काही झालं त्यानं मुंबईच नव्हे, तर संपूर्ण देश हादरला. या दुर्घटनेनंतर यंत्रणा काही तरी शिकल्या असतील असं अगदी कालपर्यंत वाटतं होतं. पण नाही, एल्फिन्स्टन दुर्घटनेतून पालिका असो रेल्वे असो वा राज्य सरकार कुणीही काही बोध घेतलेला नाही, कुणालाही काही जाग आलेली नाही हेच अंधेरी पूल दुर्घटनेनं अधोरेखीत केलं.


किड्यामुंग्यासारखंच मरायचं

मुंबईत जगणं अवघड होतानाच मरण मात्र स्वस्त झाल्याचं सातत्यानं समोर येतंय. मग ती एल्फिन्स्टन दुर्घटना असो, कमला मिल आग असो, घाटकोपर विमान दुर्घटना असो वा अगदी गार्डनमध्ये फिरायला गेल्यास मधमाशी चावून येणारं मरण असो. याच परिस्थितीमुळं एकदा बाहेर पडलेलं आपलं जीवाभावाचं माणूस परत कधी घरी येणार याकडंच घरी असणाऱ्यांचे डोळे लागलेले असतात. मुंबईकरांनो तुम्ही असंच किड्यामुंग्यासारखं जगायचं आणि किड्यामुंग्यासारखंच मरायचं. कारण तुम्ही कसं जगताय नि कसं मरताय याचं आम्हाला काहीही देणघेणं नाही, आमचं देणघेणं आहे ते फक्त तुमच्या मताशी. मत मिळालं, मग आम्ही मश्गुल आमच्या राज्यात. तुम्ही जगा काय मरा काय.


जगण्याची वाट अवघड 

कोणतीही दुर्घटना घडली की सत्ताधाऱ्यांनी चौकशीचं गुऱ्हाळ गाळत सुरक्षेची हमी (खोटी) द्यायची नि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करायची असं राजकारण सुरूच राहतं. तर सगळ्याच सरकारी यंत्रणा भ्रष्ट झालेल्या. वरवर मलमपट्टी करत वेळ मारून न्यायची त्यांना तर सवयच झाली आहे. कंत्राटदार आणि सरकारी यंत्रणा यांच साटलोटं मुंबईकरांची जगण्याची वाट अवघड करत मरणाची वाट सोपी करताना दिसतात. हे चेंगराचेंगरी, पूल, संरक्षण भिंत कोसळणं, आग लागणं यासारख्या घटनांमधून समोर येतचं आहे.


पावसाळ्यातील नियोजन अपयशी 

म्हणतात पाऊस मुंबईकरांच्या मुळावर उठलाय. खरंच पाऊस मुळावर उठलाय काय? पाऊस जेव्हा पाडायचा, जितका पडायचा तसा पडतो आहे. सरकारी यंत्रणा पावसाळ्यातील नियोजन करण्यात अपयशी ठरल्या आहेत हेच खरं आहे. अहो, साधं लहान पोरगं मुतलं, तरी आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर म्हणून मिरवणाऱ्या मुंबईतील हिंदमाता आणि खार सबवेमध्ये पाणी भरतं. अशावेळी पालिका नेमकं काय करते हेच सामान्य मुंबईकरांना मात्र कळंत नाही. त्यामुळं पावसात पाण्यात एखाद्या गटारात, नाल्यात इतकंच काय उघड्या मॅनहोलमध्ये पडून मरण्याचीही बिच्चाऱ्या मुंबईकरांच्या मनात. आणि मग "बाकी कुछ बचा तो महंगाई मार गई" आहेच की.


मजबुरीचं जगणं-मरणं

मुंबईकरांनो हे असंच चालत राहणार...तुम्ही किती ही ओरडा आम्ही इतका टॅक्स भरतो नि तितका टॅक्स भरतो. मुंबईतून सर्वाधिक टॅक्स दिल्लीत जातो मग मुंबईकडं, मुंबईकरांच्या सुरक्षिततेकडं इतकं दुर्लक्ष का असे सवाल करत रहा. दिल्लीत बसलेल्यांना काय नि मुंबईत बसलेल्यांना काय कुणालाही काहीही फरक पडत नाही. तुमची चूक आहे तुम्ही मुंबईत राहतात, तुम्ही मुंबईत जन्माला आलात. तेव्हा मुंबईत तुम्हाला हे असंच ये दिल है मुश्किल जीना यहाँ म्हणतच जगावं लागेल हेच खरं. आणि तसंही तुमचं हे मजबुरीचं जगणं-मरणं स्पिरीट म्हणून स्वीकारलंच आहे की तमाम देशानं.



हेही वाचा - 


ठप्प मुंबई , गप्प मुंबई...!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा