ठप्प मुंबई , गप्प मुंबई...!

एकीकडं पावसाचा जोर वाढलेला. तर दुसरीकडे ही अापत्ती. त्यामुळं मुंबईकरांना अापला अाजचा दिवस त्रासाचाच जाणार याची खात्री झाली. खरंतर मुंबईकर अशा अापत्तींना सरावलेला. त्यामुळं त्याची मानसिक तयारी झालेलीच असते. मुसळधार पाऊस, ओव्हरहेड वायर तुटणं किंवा इतर कारणांमुळं रेल्वे ठप्प होणं हे मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेलं.

SHARE

गेला जून महिना मुंबईकरांना चांगलाच तापवून गेला. कधी एकदा पाऊस पडतो असं झालं होतं. आधी बातमी अशी होती की यावर्षी चांगला पाऊस पडणार.  त्यामुळे मुंबईकर जरा खुशीत होता. पण मुंबईकराची ही खुशी नेहमीप्रमाणे हवेतच विरली.


मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेलं

जुलै महिन्याच्या सुरूवातीला पावसानं पुनरागमन केलं. मंगळवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पण हा पाऊस अापल्याबरोबर दुर्घटना घेऊनच अाला. सकाळी सव्वा सात वाजताच्या सुमारास अंधेरी स्थानकावर पादचारी पूल रेल्वे रूळांवर कोसळला. परिणामी काही क्षणातच पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पू्र्ण ठप्प झाली. 

एकीकडं पावसाचा जोर वाढलेला. तर दुसरीकडे ही अापत्ती. त्यामुळं मुंबईकरांना अापला अाजचा दिवस त्रासाचाच जाणार याची खात्री झाली. खरंतर मुंबईकर अशा अापत्तींना सरावलेला. त्यामुळं त्याची मानसिक तयारी झालेलीच असते. मुसळधार पाऊस, ओव्हरहेड वायर तुटणं किंवा इतर कारणांमुळं रेल्वे ठप्प होणं हे मुंबईकरांच्या पाचवीलाच पुजलेलं.


जीव मुठीत घेऊन प्रवास

मंगळवारचा दिवसही याहून वेगळा नव्हता. मुंबईत कोणती अापत्ती घडली की मुंबईकर काही तासातच सावरून अापल्या कामधंद्याला लागतो. यावेळी मुंबईकरांच्या स्पिरिटचं कौतुक होतं. पण खरंतर हे मुंबईकराचं स्पिरीट नसतं. तर ती असते त्याची हतबलता. कितीही मोठी अापत्ती झाली, तरी पोटापाण्यासाठी मुंबईकरांना घराबाहेर पडावंच लागतं. अगदी जीव मुठीत घेऊनच. 


'ना घर ना घाट का' 

गेल्या पावसात एल्फिन्स्टन स्थानकावर चेंगराचेंगरी झाली नि २९ जणांना जीव गमवावा लागला. अंधेरीतील घटनेत जीवीतहानी झाली नाही. पण ५ जण जखमी झाले.  अंधेरीचा हा पूल काही ब्रिटीशकालीन जुना पुराना पूल नव्हता. सकाळी साडेसातच्या या दुर्घटनेमुळे मुंबईला साडेसातीच लागली जणू काही. सकाळी चाकरमानी घरातून कामासाठी बाहेर पडतो आणि त्याच्या नशिबी असे भोग येतात. रेल्वे ही मुंबईची धमनी, जीवनवाहिनी तीच ठप्प झाली, तर मग मुंबईकरांचे हाल कुत्र्यासारखेच होतात. ना घर ना घाट का. 

आता त्या अंधेरीच्या पुलाची जबाबदारी कुणीच आपल्याकडे घेणार नाही. पालिकेनं हात वर केले अाहेत अाणि रेल्वेही अाता जबाबदारी झटकेल. यावरूनही अाता राजकारण सुरू झालंय. खरंतर हा पूल पालिकेचा. पण तो रेल्वे हद्दीत असल्यानं त्याच्या डागडुजीसाठी पालिकेने रेल्वेला पैसे दिल्याचं पालिकेचं म्हणणं अाहे. महापौरांनी यांच खापर रेल्वेवर फोडलंय. पण अापण दिलेल्या पैशाचा खरंच वापर होतो की नाही हे बघणंही पालिकेची जबाबदारी अाहे. पण जबाबदारी एकमेकांना टोलवण्यात सर्वसामान्यांचं किती हाल होतात याचं कुणालाच सोयरसुतक नाही.


प्रशासन ढिम्म हालत नाही

दरवेळच्या अापत्तीतून मुंबईकर लगेच सावरतो. पण अापलं प्रशासन ढिम्म हालत नाही. अंधेरीच्या पुलाचं स्ट्रक्चरल अाॅडिट नोव्हेंबर २०१७ मध्येच झालं होत. मग अवघ्या ७ महिन्यात पूल असा एवढा जीर्ण होऊन पडला का असा प्रश्न पडतो. खरंच हे स्ट्रक्चरल अाॅडिट झालं का?  अाणि झालं असल्यास ते कोणत्या दर्जाचं होतं?  याचं उत्तर रेल्वे प्रशासन देईल का?


वेळ मारून नेण्याचा प्रयत्न

दरवेळेला असे प्रश्न उपस्थित होतात. यावेळी थातूर मातूर कारणं देऊन समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो. पण कोणतंच प्रशासन कोणत्याच प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत नाही. यावर दीर्घकालीन उपाययोजनांचा विचार होत नाही. अापत्ती घडली की फक्त अाश्वासने देऊन वेळ मारून नेण्याकडे अधिक कल असतो. पण सावधगिरी बाळगण्यासाठी काय करायला हवं की जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणं थांबवता येईल यावर कोणीही गांभीर्याने विचार करत नाही. 

दरवेळेला फक्त मुंबईकरांच्या स्पिरिटचं कौतुक करून अापला मुंबईकर यातून लगेच सावरणार याची खात्री असल्यानं प्रशासनही निर्धास्त असते. मग अशा कितीही अापत्ती येवोत. अाणि यामध्ये कितीही जीव जावोत. पण असंवेदनशील प्रशासनाला नागरिकांच्या लाखमोल जीवापेक्षा अापला नाकर्तेपणा कसा उघड होणार नाही याचीच चिंता असते. मग अापत्तींना सरावलेला मुंबईकरही हतबलतेनं गप्पच बसणं पसंत करतो.संबंधित विषय
ताज्या बातम्या