Advertisement

Coronavirus in Dharavi: म्हणून धारावीचं कौतुक करावं तेवढं कमीच

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिलं आणि कोरोना‍ विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं.

Coronavirus in Dharavi: म्हणून धारावीचं कौतुक करावं तेवढं कमीच
SHARES

काही दिवसांपूर्वी कोरोनाचं हाॅटस्पाॅट बनलेल्या धारावीत आता कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे धारावी कोरोनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील या प्रयत्नांची दखल घेत धारावी पॅटर्नचं कौतुक केलं आहे. याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (maharashtra cm uddhav thackeray praised fight against coronavirus in dharavi) यांनीही धारावीकरांचं अभिनंदन केलं आहे.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी व दाट लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंशिस्तीने कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिलं आणि कोरोना‍ विरूद्धच्या लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर नाव नोंदवलं. धारावीत सद्यस्थितीत रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८२ टक्क्यांवर गेले असून ॲक्टिव्ह केसेसची संख्या फक्त १६६ आहे. महापालिका प्रशासन, स्वंयसेवी संस्था आणि स्थानिक धारावीकर यांच्या एकात्मिक प्रयत्नांचं हे यश आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रयत्नांना शाबासकी दिली.

दाटीवाटीची लोकवस्ती

धारावीतील ८० टक्के लोकसंख्या ४५० सामूहिक शौचालयांचा वापर करते. बहुतेक लोकसंख्या बाहेरच्या अन्नावर अवलंबून आहे. १० बाय १० च्या घरात इथे ८ ते १० लोक राहतात. शारीरिक अंतर पाळणं, रुग्णाला होम क्वारंटाईन करणं शक्य नव्हते. अशावेळी ‘चेस द व्हायरस’ उपक्रमातून ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटींगची संकल्पना चार पातळीवर वेगाने राबविण्यात आली, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. 

३.६ लाख लोकांचं स्कॅनिंग

या मोहिमेत ४७ हजार ५०० घरं डॉक्टर आणि खाजगी दवाखान्यामार्फत तपासण्यात आली.  ३.६ लाख लोकांचं स्कॅनिंग करण्यात आलं. प्रो ॲक्टिव्ह स्क्रीनिंग, फिवर कॅम्प, अर्ली डिटेक्शन, योग्य वेळेत विलगीकरण, सुसज्ज आरोग्य सुविधा आणि क्वारंटाईन  सेंटर्स  यामुळे साथ नियंत्रणात ठेवता आली. १४ हजार ९७० लोकांचं मोबाईल व्हॅनद्वारे स्कॅनिंग करण्यात आलं. ८२४६ ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करून सर्व्हे करण्यात आला. १४ हजार लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करून त्यांचं विलगीकरण करण्यात आलं.

हेही वाचा - धारावी मॉडेलचं जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक

खासगी डाॅक्टरांची मदत

खासगी सार्वजनिक भागीदारीतून उच्च जोखमीचे झोन निश्चित करून खाजगी प्रॅक्टिशनर्सच्या सहकार्याने मिशन मोडन स्वरूपात काम करण्यात आलं. पालिकेच्या वैद्यकीय उपचार केंद्राशिवाय २४ खासगी डॉक्टर यासाठी पुढे आले. त्यांना महापालिकेने सर्व वैयक्तिक सुरक्षा साधनांचा पुरवठा केला. टेस्ट किट्स, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सीमीटर, मुखवटे, हातमोजे (हॅण्ड ग्लोव्हज)  उपलब्ध करून देऊन घरोघर जाऊन तपासणी सुरु केली. सर्व चिकित्सकांनी आपले दवाखाने सुरु ठेवले. संशयितांना बीएमसी रुग्णालयाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आलं. महापालिकेने सर्व खासगी दवाखान्यांची स्वच्छता करून सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. 

अन्नधान्य वाटप

साई हॉस्पिटल, प्रभात नर्सिंग होम, फॅमिली केअर सारखी रुग्णालये ताब्यात घेण्यात आली. या भागात जागेची कमी असल्याने होम क्वारंटाईनचा विचार न करता संस्थात्मक क्वारंटाईन वर भर दिला गेला. यासाठी शाळा, मंगल कार्यालये, स्पोर्टस कॉम्प्लेक्स उपयोगात आणले गेले. नाश्ता, दुपार आणि रात्रीच्या जेवणासाठी कम्युनिटी किचनची संकल्पना राबविली गेली. कंटेनमेंट झोनमधील लोकांनी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांना बीएमसीकडून अन्नधान्याची २५ हजार किराणा किट तर २१ हजार जेवणाच्या पाकिटांचे वितरण करण्यात आले. याशिवाय आमदार, खासदार आणि नगरसेवकांनीही या भागात मोफत अन्नधान्याचे वितरण केलं.

२४/७ पद्धतीने नर्स, डॉक्टर आणि वैद्यकीय मनुष्यबळाची उपलब्धता करून देण्यात आली. मल्टिव्हिटॅमिन्स आणि औषध पुरवठा सुरळित ठेवण्यात आला. १४ दिवसांच्या अल्प काळात २०० खाटांचे ऑक्सीजन पुरवठ्यासह व्यवस्था असलेले  सुसज्ज रुग्णालय उभारलं गेलं. फक्त क्रिटीकल रुग्णांना धारावीबाहेर नेण्यात आले, तर ९० टक्के रुग्णांवर धारावीतील वैद्यकीय उपचार केंद्रातच उपचार करण्यात आले. हाय रिस्क झोनची निवड करण्यात आली. कोविड योद्धा म्हणून सामाजिक नेतृत्व या भागात  नियुक्त केले गेलं.  

हेही वाचा - Coronavirus In Dharavi: धारावीत आढळले फक्त ३ कोरोनाबाधित रुग्ण

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement