मुंबईतील (mumbai) 'सावली' बारवरून राजकारण तापले असतानाच मुंबईतील अनेक बारमध्ये (dance bar) ऑर्केस्ट्राच्या नावाखाली अश्लील नृत्य सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गेल्या दोन दिवसांत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकांनी ताडदेव, अंधेरी आणि घाटकोपरमधील नामांकित बारवर छापा टाकून अनेकांची धरपकड केली. या तीनही बारमधून 25 बारबालांची सुटका करण्यात आली आहे.
तसेच त्यांच्यावर पैसे उडवत अश्लील नृत्यास प्रोत्साहन देणाऱ्या जवळपास 60 जणांवर कारवाई करण्यात आली. बारचालक आणि मालक यांच्यावर याबाबत संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परवानगीपेक्षा अधिक बारबाला ठेवल्या जातात. त्यांना लपवण्यासाठी बारमध्ये अनेक छुप्या जागा तयार केल्या जातात. असे असले तरी बाहेरून सर्व आलबेल आणि नियमानुसारच सुरू असल्याचे चित्र निर्माण केले जाते.
ताडदेव (tardeo) येथे नुकत्याच सुरू झालेल्या पुष्पा बारमध्ये असाच प्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाला मिळाली. पथकाने शुक्रवारी मध्यरात्री या बारवर छापा टाकला.
बारमध्ये झडती घेतली असता 12 बारबाला नृत्य करताना सापडल्या. 32 ग्राहक बारबालांच्या नृत्यावर खुश होऊन पैशाची उधळण करताना आढळले. ग्राहक, कामगार, बारचालक अशा सुमारे 47 जणांविरुद्ध ताडदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अंधेरी येथील साची बार अँड रेस्टॉरंटमध्ये नियम डावलून गाणी गाण्याच्या बहाण्याने बारबालांना अश्लील नृत्य करण्यास लावले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
गुन्हे शाखा युनिट 10 च्या पथकाने शहनिशा करण्यासाठी या बारवर छापा टाकला असता सात महिला नृत्य करताना आढळून आल्या. जवळपास वीस ग्राहकांना त्यांना नृत्य करण्यास प्रोत्साहित करताना पकडण्यात आले.
ग्राहक, बार कर्मचारी, बारमालक अशा सुमारे 26 जणांविरुद्ध अंधेरी(andheri) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटकोपर येथील त्रिमूर्ती बारमधून तीन ते चार बारबालांची गुन्हे शाखा युनिट सात च्या पथकाने सुटका केली.
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली सर्व नियम पायदळी तुडवून डान्सबार चालविणाऱ्या चालक आणि मालकासह याप्रकरणी 16 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे आणि मद्यपान कक्ष यामधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम 2016 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा