Advertisement

राज्यात पर्यटनविकासासाठी २५० कोटींचा निधी वितरणाचे निर्देश

पर्यटनस्थळांच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी दिले.

राज्यात पर्यटनविकासासाठी २५० कोटींचा निधी वितरणाचे निर्देश
SHARES

राज्यातील महाबळेश्वर, एकविरा देवस्थान, लोणार सरोवर, अष्टविनायक, कोकणातील समुद्रकिनारे आदी पर्यटनस्थळांच्या विकासासाठी २५० कोटी रुपयांचा तातडीने निधी वितरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी गुरूवारी दिले. 

राज्यातील पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या १० जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासही त्यांनी मान्यता दिली. जिल्ह्यातील पर्यटनविकासात खाजगी संस्थांना सहभागी करून घेण्यासाठी जिल्ह्यांमध्ये पर्यटन सोसायटी स्थापन करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

राज्यातील पर्यटनविकासाच्या प्रकल्पांचा आढावा आणि पर्यटनवाढीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray), पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा- शरद पवार राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत?, चर्चा निराधार असल्याचा नवाब मलिक यांचा दावा

राज्य मंत्रिमंडळाने कालच राज्याच्या साहसी पर्यटन धोरणास मान्यता दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पर्यटनविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्पीय तरतुदीच्या २५ टक्के निधी टप्प्याटप्याने वितरित करण्याबरोबरच पर्यटनविकासाची १०० टक्के पूर्ण झालेल्या कामांची ७२ कोटींची देयके अदा करण्यात यावीत. जिल्हा पर्यटन अधिकाऱ्यांची प्रायोगिक तत्वावर आणि कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करताना ॲग्रो टुरीझमच्या क्षेत्रात कार्यरत तज्ञांचा विचार व्हावा, असेही ठरविण्यात आले.

साहसी पर्यटन धोरणानुसार राज्यात साहसी पर्यटन आयोजित करणाऱ्या आयोजकांना पर्यटन संचालनालयाकडून प्रथम तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र  व आवश्यक सर्व  अर्हता प्राप्त केल्यानंतर अंतिम नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येईल. साहसी पर्यटन आयोजकांनी पर्यटकांचा सुरक्षतेबाबत धोरणात नमूद केलेल्या तरतुदीनुसार दक्षता घेणे आवश्यक राहील. साहसी पर्यटन धोरणाचा परिणामकारक अंमलबजावणीकरिता राज्यस्तरीय समिती व विभागीय स्तरावर समित्या गठित करण्यात येतील.  या समित्यांमध्ये जमीन हवा आणि जल पर्यटनातील तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश असेल.साहसी पर्यटन उपक्रम सुरक्षित व शिस्तबद्धरित्या आयोजित करण्यासाठीच्या सविस्तर आणि तपशीलवार सुरक्षा मार्गदर्शक सूचना पर्यटन विभागाच्या www.maharashtratourism.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जातील


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा