Advertisement

लाॅकडाऊनमधून मुंबई, पुण्यातील मेट्रो रेल्वेच्या कामांना मंजुरी

मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिका आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या मेट्रो रेल्वेची (metro) कामे व इतर मान्सूनपूर्व कामांना सूट देण्याचा आदेश राज्य शासनाने आज काढला आहे.

लाॅकडाऊनमधून मुंबई, पुण्यातील मेट्रो रेल्वेच्या कामांना मंजुरी
SHARES

राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून (lockdown) ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे कर्मचारी व काळजीवाहक, पिठाची गिरणी, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिका आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या मेट्रो रेल्वेची (metro) कामे व इतर मान्सूनपूर्व कामांना सूट देण्याचा आदेश राज्य शासनाने आज काढला आहे.

देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मेट्रोच्या सर्व प्रकल्पांची कामे बंद करण्यात आली होती. पण २० एप्रिलपासून लाॅकडाऊनमध्ये अंशत: सूट देण्यात आल्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) सोमवारपासून शहरातील सर्व ९ मेट्रो मार्गांची कामे सुरू केली होती. त्याचसोबत उड्डाणपूल, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) आणि महामार्गांच्या नूतनीकरणाची कामे देखील सुरू करण्यात आली होती. 

एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव यांच्या सूचनेनुसार प्रकल्पांच्या ठिकाणी छावण्या उभारून ११ हजार कामगारांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. मेट्रो मार्गांवर ५४४४, एमटीएचएलवर ५०४२ आणि इतर पायाभूत सुविधा प्रकल्पांवर ५७६ कामगार आहेत. त्यांना अन्नपाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.

मात्र ही अशंत: बंदी पुन्हा मागे घेण्यात आल्याने कंत्राटदारांमध्ये काहीसा गाेंधळ झाला होता. मात्र राज्य शासनाने पुन्हा जारी केलेल्या आदेशात काही सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये मेट्रो रेल्वेची कामे, पॅक हाऊस, बियाणे व फलोत्पादनाच्या तपासणी व उपचार सुविधांची आयात निर्यात, शेती व बागायतीशी संबंधित संशोधन संस्था, वृक्ष लागवड व मधमाशी वसाहती, मध व त्यासंबंधीच्या उत्पादनांची राज्याअंतर्गत व आंतरराज्यीय वाहतूक, ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया प्रकल्प, डाळ मिल, पंख्यांची दुकाने यांचा समावेश आहे. त्याशिवाय वन विभागाच्या कार्यालयासह वनीकरण, वृक्षारोपण व त्यासंबंधित कामांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाने  ठरवून दिलेल्या मानकानुसार (एसओपी) भारतीय बंदरांमधील समुद्री जहाजांना आवक-जावक व त्यांच्या हालचालींना परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाऊनमधून सूट दिली असली तरी ही कामे करताना शासनाने घोषित केलेले नियम, सामाजिक अंतर व स्वच्छता यांची काळजी संबंधित आस्थापनांनी घ्यावी, असंही या आदेशात म्हटले आहे.

एमएमआरडीएने सर्व मेट्रो प्रकल्पांची कामे टप्पाटप्प्याने सुरू करण्याच्या सूचना कंत्राटदारांना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व ९ मेट्रो मार्गांची कामे आणि पावसाळापूर्व कामांवर भर दिला जाईल. प्रकल्पांच्या स्थळी कामगारांना मास्क, सॅनिटायझर आदी सुरक्षा साधने दिली जात आहेत, असं एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा