Advertisement

'कर्वे रोड असोसिएशन'ची कमाल, परिसर केला हिरवागार


'कर्वे रोड असोसिएशन'ची कमाल, परिसर केला हिरवागार
SHARES

चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडे उतरलो की आपल्याला दिसते महर्षी कर्वे मार्गावरील लहान मोठ्या झाडांची रांग, रस्त्यावर पडणारी थंडगार सावली, सोसायट्यांच्या कुंड्यांमधून डोकावणारी हिरवाई, स्वच्छ आणि नीटनेटकेपणा. परिसरातील इतर ठिकाणांच्या तुलनेत हा भाग उजवा ठरण्यामागे 'महर्षी कर्वे रोड रेसिडेंट असोसिएशन'ची मोठी मेहनत आहे. पूर्वी ही असोसिएशन महापालिकेच्या प्रगत स्थळ व्यवस्थापना(एएलएम)चा भाग होती. त्यातूनच हा परिसर हरित आणि स्वच्छ बनविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले. 'अ' विभागातील अधिकारी आणि स्थानिकांच्या सहभागातूनच हे शक्य झाले.

ओला आणि सुका कचरा वेगळा करणे, परिसरात स्वच्छता ठेवणे, ठिकठिकाणी वृक्षारोपण करणे यासाठी महर्षी कर्वे रोड रेसिडेंट असोसिएशनकडून स्थानिकांना प्रोत्साहित केले जाते. स्थानिकांच्या जनजागृतीकरिता असोसिएशन खास पोस्टरही बनवते. हे पोस्टर परिसरातील लहान मुलांच्या माध्यमातून घरोघरी वाटण्यात येते. परिणामी विभागातील अबालवृद्ध एकत्रित येऊन परिसराची स्वच्छता करतात. ओला-सुका कचरा वेगळा करुन महापालिकेच्या घनकचरा विभागाकडे सुपूर्द करतात. एवढेच नव्हे, तर एका स्थानिक खासगी कंपनीकडे विभागातील झाडांच्या पालनपोषणाची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे, अशी माहिती महर्षी कर्वे रोड रेसिडेंट असोसिएशनच्या अध्यक्षा दर्शना चोक्सी यांनी दिली.

या परिसरात उच्चभ्रू नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. झोपडपट्टी नसल्याने हा परिसर स्वच्छ ठेवणे आणि येथील विकासाला प्राधान्य देणे इतर विभागाच्या तुलनेत सोपे जाते. महर्षी कर्वे रोड रेसिडेंट असोसिएशन अंतर्गत 540 इमारती येतात. यातून दररोज 2 लाख 70 हजार किलो कचरा महापालिकेकडे जमा हाेतो. तरी हा परिसर इतर परिसराच्या तुलनेत स्वच्छ आणि सुंदर असल्याची प्रतिक्रिया महापालिकेचे 'एएलएम' अधिकारी सुभाष पाटील यांनी दिली.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा