Advertisement

Exclusive: हत्येच्या मुख्य सूत्रधारापर्यंत कधी पोहोचणार?- मुक्ता दाभोलकर

सरकार आणि पोलिसांनी डाॅ. दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावून या कटाचा मुख्य सूत्रधार कोण? हे सांगावं म्हणून 'अंनिस'ने राज्यभर 'जवाब दो' हे आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करताना दाभोलकर यांनी सरकारकडून उत्तर घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

Exclusive: हत्येच्या मुख्य सूत्रधारापर्यंत कधी पोहोचणार?- मुक्ता दाभोलकर
SHARES

डाॅ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन ५ वर्षे झाली तरी त्यांचे मारेकरी अजून सापडलेले नाहीत, त्यासाठी आजही सरकारकडे आम्हाला पाठपुरावा करावा लागत आहे. हे निश्चितच क्लेशदायक आहे. या ५ वर्षांत डाॅ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी २ जणांना अटक झाली असली, तरी ती पुरेशी नाही. कारण हा एक मोठा कट असून या कटाचा उलगडा करून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचा मत डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस)च्या कार्यकर्त्या डाॅ. मुक्ता दाभोलकर यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना व्यक्त केलं.

सरकार आणि पोलिसांनी डाॅ. दाभोलकर यांच्या हत्येचा छडा लावून या कटाचा मुख्य सूत्रधार कोण? हे सांगावं म्हणून 'अंनिस'ने राज्यभर 'जवाब दो' हे आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व करताना दाभोलकर यांनी सरकारकडून उत्तर घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


कधी झाली होती हत्या?

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांची २० सप्टेंबर २०१३ ला पुण्यात हत्या झाली होती. या हत्येला ५ वर्षे पूर्ण झाले असून अजूनही डाॅ. दाभोलकरांचे मारेकरी मोकाट आहेत. डाॅ. दाभोलकरांनंतर काॅ. गोविंद पानसरे, डाॅ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचीही हत्या झाली. या चारही हत्यांमध्ये समान सूत्र असल्याचंही तपासादरम्यान समोर आलं.

पण ५ वर्षात डाॅ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास म्हणावा तसा पुढे गेला नाही. या चारही हत्या विवेकवादाची हत्या असून हा कट आहे, असं म्हणत 'अंनिस'ह विवेकवादी संघटनांनी डाॅ. दाभोलकरांच्या पाचव्या स्मृतीदिनी मुंबईसह राज्यभर 'जबाब दो' आंदोलन करत सरकारला सवाल केला आहे.


सहकार्याने तपास करा

गेल्या काही दिवसांत तपासाची चक्र वेगाने फिरत असून २ जणांना याप्रकरणी अटकही झाली आहे. त्याबद्दल मुक्ता दाभोलकर यांनी समाधान व्यक्त केलं. कर्नाटक पोलिसांनी पत्रकार गौरी लंकेश हत्येप्रकरणी तपासाला वेग दिल्यानंतर त्यांच्या तपासातून अनेक धागेदोरे मिळाले आणि आता नुकतीच डाॅ. दाभोलकर हत्येप्रकरणी एकाला अटक झाली आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी एकमेकांच्या सहकार्याने काम करावं, अशी अपेक्षाही मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केली.


आरोपांना आधार

डाॅ. दाभोलकर यांच्यासह पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्येत एकसूत्र असून हिंदुत्ववादी संघटनांकडूनच या हत्या करण्यात आल्याचं तपासातून आणि अटकसत्रांमधून दिसून येत आहे. पण हिंदुत्ववादी संघटनांनी मात्र आपल्याला यात गोवलं जात असल्याचं म्हणत हे सर्व आरोप नाकारले आहेत. याविषयी बोलताना मुक्ता दाभोलकर यांनी हा तपास वेगवेगळ्या यंत्रणांनी केल्याने हिंदुत्ववादी संघटनांच्या दाव्यांना काहीही अर्थ नसल्याचं म्हटलं.


विचारांची हत्या अशक्य

डाॅ. दाभोलकरांची हत्या झाली, पण त्यांच्या विचारांची हत्या कोणी करू शकलं नाही, त्यांचे विचार संपले नाहीत. त्यामुळेच डाॅ. दाभोलकरांच्या हत्येनंतर 'अंनिस'चं कार्य थांबलेलं नाही. 'अंनिस'चं कार्य राज्यभरातील कार्यकर्ते पुढे नेत असून ते आणखी जोमानं वाढवण्यात येईल, असंही मुक्ता दाभोलकर यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीद्वारे सोमवारी २० ऑगस्टला दादर ते चैत्यभूमीदरम्यान 'जवाब दो' या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया यूथ फेडरेशन यांसारख्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.हेही वाचा-

राज्यात घातपात घडवण्याच्या प्रकरणातील चौथ्या आरोपीला अटक

दाभोलकर हत्या प्रकरण: पांगरकरला २८ आॅगस्टपर्यंत पोलिस कोठडीसंबंधित विषय