Advertisement

मराठीच्या 44 शाळा होणार इंग्रजी पब्लिक स्कूल


मराठीच्या 44 शाळा होणार इंग्रजी पब्लिक स्कूल
SHARES

मुंबई - मुंबई महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांशी संलग्न असलेल्या पूर्व प्राथमिक वर्गांचं माध्यमनिहाय पब्लिक स्कूलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहेत. तब्बल 114 शाळांमध्ये पब्लिक स्कूल सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये मराठी माध्यमाच्या 40 शाळांमध्ये पब्लिक स्कूल सुरू करण्यात येणार आहेत. मराठी शाळांना लागलेली गळती आणि बंद होणाऱ्या शाळांच्या पार्श्वभूमीवर आता पब्लिक स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी भाषेतून शिक्षण देत शाळा टिकवण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये सन 2007-08 पासून 3 ते 5 वयोगटातील मुलांसाठी 504 बालवाड्या चालवण्यात येत आहेत. या सर्व बालवाडीत छोटा शिशू (ज्यू.केजी) आणि मोठा शिशू (सी.केजी)च्या वर्गात सध्या 13 हजार 277 विद्यार्थी शिकत असून मोठ्या शिशूत शिकणाऱ्या मुलांपैकी 7 हजार 109 विद्यार्थी हे महापालिका शाळेतील पहिल्या इयत्तेत शिकत आहेत. एकाबाजूला सध्याच्या काळात महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घट होत असताना या बालवाड्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी हे इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेत असतात. 

विद्यार्थ्यांची होणारी गळती लक्षात घेऊन महापालिकेच्या शाळांमध्ये एम.पी.एस संकल्पनेअंतर्गत ज्युनिअर के.जी ते इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. एमपीएस या शाळा इंग्रजी माध्यमाच्याच आहेत. परंतु पब्लिक स्कूल हे इंग्रजी माध्यमांच्या शाळांपुरते मर्यादित न राहता सर्व भाषिक शाळांमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्यात 84 शाळा या पब्लिक स्कूलमध्ये रुपांतरीत करण्यात आल्यानंतर आता उरलेल्या 114 भाषिक शाळांमध्ये पब्लिक स्कूल सुरू करण्यात येणार आहेत. नव्याने करण्यात येणाऱ्या पब्लिक स्कूलमध्ये 44 मराठी शाळा, 34 हिंदी शाळा, 20 ऊर्दू शाळा यासह एकूण प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ऊर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असून या माध्यमाच्या शाळाही इंग्रजी भाषेकडे वळत आहेत. कुलाबा ते गिरगाव, चंदनवाडीपर्यंतच्या शाळांमध्ये एकही पब्लिक स्कूल सरू करण्यात येत नाही. ताडदेवपासून दहिसर आणि मुलुंडपर्यंतच्या शाळांमध्ये पब्लिक स्कूल सुरू करण्यात येत आहेत. या पब्लिक स्कूलमुळे एकदा बालवाडीमध्ये विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यानंतर दहावीपर्यंत कोठेही अन्यत्र प्रवेशासाठी जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच त्यांची शैक्षणिक प्रगती आणि सर्वांगीण विकास यामध्ये खंड पडणार नाही आणि पब्लिक स्कूलमुळे विद्यार्थ्यांची होणारी गळती रोखता येईल, असेही त्यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा