Advertisement

महापालिकेच्या वर्गावर प्राचार्यांची उशिरा हजेरी


महापालिकेच्या वर्गावर प्राचार्यांची उशिरा हजेरी
SHARES

मुंबई - मुंबईच्या महापौरपदी विराजमान झालेल्या प्राचार्य विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपण वेळेवर सभागृह सुरु करू असा शब्द सदस्य नगरसेवकांना पहिल्या सभागृहात दिला होता. परंतु दुसऱ्याच सभागृहात महापौरांनी तब्बल सव्वा तास उशिराने हजेरी लावली. प्राचार्य असलेल्या महाडेश्वर हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वेळेवर वर्गावर जात असले तरी महापालिकेच्या वर्गावर उशिराने आल्यामुळे सभागृहातील नगरसेवकांनी एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

मुंबईच्या महापौरपदी शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. ही सभा सकाळी 11 वाजता बोलावण्यात आली होती. ही सभा महापौरांनी वेळेवर सुरू करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे यापुढे महापालिका सभागृह हे वेळेवर सुरु होईल, असे निश्चित मानले जात होते. परंतु, शनिवारी झालेले दुसरे सभागृह हे दुपारी बारा वाजता सुरु होण्याऐवजी 1 वाजून 10 मिनिटांनी सुरू झाले. त्यानंतर आरोग्य समिती, बाजार आणि उद्यान समिती, विधी समिती, महिला आणि बालकल्याण समिती आणि वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांची नावे महापौरांनी जाहीर केली.

परंतु, 61 हजार कोटींच्या मुदत ठेवीच्या प्रश्नाबाबत प्रशासनाला निवेदन न करायला देता, त्यांना लेखी स्वरुपात देण्याचे आदेश महापौरांनी देत सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यामुळे नगरसेवकांना सव्वा तासाची प्रतीक्षा करायला लावल्यानंतर अर्धा तासात कामकाज संपवले. दरम्यान, सभागृहाचे मास्तर असलेले महापौर सभागृह सुरु झाल्यानंतर वेळेत न आल्यामुळे काँग्रेससह, सपा आणि मनसेच्या नगरसेवकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती. महाडेश्वर मास्तर, दुसऱ्याच सभागृहात उशिरा आल्यामुळे आता पुढच्या सभागृहाला तरी वेळेवर याल ना असा सवाल नगरसेवकांनी केला आहे.

तहकुबीनंतर केली कामकाजाची घोषणा

सभागृहाचे कामकाज तहकुब करण्याची घोषणा केल्यानंतर पुढील सभागृहातील कामकाजाच्या कार्यक्रमांची घोषणा केली. दुसऱ्याच सभागृहात प्राचार्य असलेले महाडेश्वर गोंधळलेले पहायला मिळाले असून त्यांना चिटणीस विभागही चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करत असल्याची बाब समोर आली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा