Advertisement

सोसायट्यांकडे म्हाडाची २६२ कोटींची थकबाकी, रहिवाशांना लाखोंच्या नोटिसा!

८९ सोसायट्यांकडे म्हाडाचे तब्बल २६२ कोटी रुपये थकले आहेत. या सोसायट्यांनी ही थकबाकी भरावी म्हणून म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पण सोसायट्या काही मंडळाला भीक घालत नसल्याचे चित्र आहे.

सोसायट्यांकडे म्हाडाची २६२ कोटींची थकबाकी, रहिवाशांना लाखोंच्या नोटिसा!
SHARES

म्हाडाकडून म्हाडा वसाहतीतील सोसायट्यांना मलनि:सारण, दिवाबत्ती आणि पाणी यासह अन्य काही सुविधा पुरवल्या जातात. या सुविधांच्या मोबदल्यात म्हाडा सोसायट्यांकडून सेवा शुल्काची (सर्व्हिस चार्ज) वसूली केली जाते. मात्र गेल्या २० वर्षांपासून म्हाडाच्या ८९ सोसायट्यांनी हे सेवा शुल्कच भरलेलं नाही. त्यामुळे या ८९ सोसायट्यांकडे म्हाडाचे तब्बल २६२ कोटी रुपये थकले आहेत. या सोसायट्यांनी ही थकबाकी भरावी म्हणून म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. पण सोसायट्या काही मंडळाला भीक घालत नसल्याचे चित्र आहे.


फ्लॅटधारकांनाही दिल्या नोटिसा

ही थकबाकी वसूल करण्यासाठी मंडळाने कंबर कसली असून या ८९ सोसायट्यांना थकबाकी भरण्यासंबंधी नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली आहे. सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांसह फ्लॅटधारकांनाही या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटिसा मिळाल्यापासून दहा दिवसांत थकबाकीची रक्कम भरण्याचे आदेश या देण्यात आले आहेत.


लाखोंच्या नोटिसा, दंड भरणार कसा?

८९ सोसायट्यांमधील १ लाख ८३ हजार रहिवाशांना या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. या नोटिसांमधील लाखोंची रक्कम बघून रहिवासी हवालदिल झाले आहेत. १९९८ पासून या सोसायट्यांनी सेवा शुल्क भरले नसल्याने प्रत्येक रहिवाशाकडे साधरणपणे १ ते दीड लाखांपर्यंतची थकबाकी आहे. त्यानुसार अंदाजे १ लाख ४१ हजार रहिवाशांकडून प्रत्येकी १ लाख २ हजार रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. तर उरलेल्या रहिवाशांना दीड लाख रूपयांची नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, सेवाशुल्काची रक्कम पूर्वी १५५ रुपये होती. आता मंडळाने त्यात वाढ केली असून नवे दर १०२७ रुपये असे करण्यात आले आहेत.


हफ्त्यांमध्ये दंड भरण्याची मुभा?

थकबाकी न भरणाऱ्या रहिवाशांविरोधात आता मंडळाकडून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. रहिवाशांना ही थकबाकी भरणे सोपे व्हावे, यासाठी दहा हप्त्यांमध्ये थकबाकी भरण्याची मुभा देण्याचा मंडळाचा विचार असल्याचे समजते आहे. तसे झाल्यास रहिवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे थकीत सेवा शुल्कावर साडे बारा टक्के व्याजही मंडळाकडून लावले जाते. तर सेवा शुल्क वेळेत न भरल्याने विलंब शुल्कही आकारले जाते. त्यामुळेच थकबाकीची रक्कम फुगली आहे. या धर्तीवर व्याज आणि विलंब शुल्क माफ करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.



हेही वाचा

म्हाडाला ६१ लाखांचा चुना! आरोपी अटकेत


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा