Advertisement

धक्कादायक! पुनर्रोपित झाडांची होणार कत्तल? एमएमआरसीचा प्रताप

मेट्रो-३ कारशेडचे काम आरेमध्ये करण्यात येणार आहे. या प्रकल्पात ५ हजाराहून अधिक झाडांची कत्तल होणार आहे. कारशेडची जागा आणि झाडांची कत्तल या दोन्ही मुद्यांवरून एमएमआरसीविरोधात पर्यावरणप्रेमी रस्त्यावरील लढाईसह न्यायालयीन लढाई लढत आहे.

धक्कादायक! पुनर्रोपित झाडांची होणार कत्तल? एमएमआरसीचा प्रताप
SHARES

मेट्रो-३ मधील झाडांच्या कत्तलीवर चांगलेच रान पेटलेले असताना आता त्यात आणखी एक ठिणगी पडणार आहे. कारण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ने चक्क मेट्रो-३ प्रकल्पातील पुनर्रोपित झाडांच्याच कत्तलीचा घाट घातल्याचा धक्कादायक आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

एमएमआरसीएच्या या प्रतापामुळे पर्यावरणप्रेमीही चक्रावले आहेत. कारण जी झाडे वाचवत त्यांचे पुनर्रोपण करण्यात आले त्याच झाडांची कत्तल करण्याच्या एमएमआरसीच्या निर्णयाने पर्यावरणप्रेमी विचारात पडले आहेत. झाडांच्या पुनर्रोपणामध्येही एमएमआरसीकडून सर्वसामान्यांची दिशाभूल केली जात असून हा मोठा घोटाळा असल्याचा आरोपही पर्यावरण प्रेमींनी केला आहे.


IMG-20171125-WA0043.jpg


झाडांच्या कत्तलीला पर्यावरणप्रेमींचा विरोध

मेट्रो-३ कारशेडचे काम आरेमध्ये करण्यात येणार आहे. या प्रकल्पात ५ हजाराहून अधिक झाडांची कत्तल होणार आहे. कारशेडची जागा आणि झाडांची कत्तल या दोन्ही मुद्यांवरून एमएमआरसीविरोधात पर्यावरणप्रेमी रस्त्यावरील लढाईसह न्यायालयीन लढाई लढत आहे.

या प्रकल्पात शक्य तितकी झाडे वाचवण्याचा प्रयत्न 'सेव्ह ट्री' आणि 'सेव्ह आरे' या ग्रुपकडून होत आहे. असे असताना आता वाचवलेली आणि पुनर्रोपित केलेल्या झाडांवरच पुन्हा एमएमआरसी कशी कुऱ्हाड चालवणार आहे, याचा पर्दाफाश 'सेव्ह ट्री'च्या सदस्यांनी शनिवारी केला आहे. आरेच्या पाहणीसाठी 'सेव्ह ट्री'चे काही सदस्य शनिवारी सकाळी पिकनिक पॉईंट परिसरात गेले असता ही धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आली.

मेट्रो-३ प्रकल्पातील बाधित झाडांचे पुनर्वसन ज्या तीन साईटवर केले जात आहे, त्यापैकी एक साईट आरेतील पिकनिक पॉईंट येथे आहे. या साईटवर दोन वर्षांपूर्वी काही झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. त्याच झाडांवर मेट्रो-३ च्या कामासाठी ही झाडे कापली जाणार असल्याच्या नोटीसा लावण्यात आल्याचे पाहून धक्काच बसल्याची माहिती सेव्ह ट्रीचे सदस्य झोरू बाथेना यांनी दिली आहे.


IMG-20171125-WA0049.jpg


ही तर मुंबईकरांची दिशाभूल

पुनर्रोपित झाडांची कत्तल एमएमआरसी कशी काय करू शकते? असा प्रश्न उपस्थित करत बाथेना यांनी एमएमआरसी झाडांची कत्तलच नव्हे तर संपूर्ण मेट्रो-३ प्रकल्पाद्वारे मुंबईकरांची दिशाभूल आणि फसवणूक करत असल्याचा आरोप केला आहे. तर ही प्रस्तावित कत्तल त्वरीत मागे घेण्याची मागणी सेव्ह ट्री आणि सेव्ह आरेकडून आता करण्यात येत असून या प्रकरणाच्या चौकशीही मागणी केली आहे. दरम्यान एमएमआरसीच्या प्रवक्त्याने हे आरोप फेटाळले असून पुनर्रोपणाची साईट वेगळी आहे, तर झाडे कापली जाणार आहेत ती साईट वेगळी असल्याचे 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले आहे. सेव्ह ट्री आणि सेव्ह आरे मात्र पुराव्यानिशी पुनर्रोपित साईटवरीलच झाडे कापली जाणार असल्यावर ठाम आहेत.


पुनर्रोपित झाडांची देखभाल एमएमआरसी करत नसल्याने पुनर्रोपित झाडांपैकी ३५ टक्के झाडे दगावली आहेत. हे केवळ आम्ही म्हणत नाही तर उच्च न्यायालयाच्या समितीचा अहवालही हेच सांगतो. तर आता पुनर्रोपित झाडेही कापायला एमएमआरसी निघाली आहे यावरूनच एका सरकारी यंत्रणा कशी अप्रमाणिक आहे, कशी मनमानीपणे काम करते हेच समोर येत आहे.
- स्टॅलिन दयानंद, प्रकल्प संचालक, वनशक्ती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा