आणिक पांजारपोळ लिंक रोड प्रकल्पातील 2000 विस्थापित वाऱ्यावर

 Mumbai
आणिक पांजारपोळ लिंक रोड प्रकल्पातील 2000 विस्थापित वाऱ्यावर
Mumbai  -  

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आणिक पांजारपोळ लिंक रोड प्रकलातील 2000 विस्थपित गेल्या सात वर्षांपासून वाऱ्यावर आहेत. या 2000 विस्थपितांचे त्वरित पुनर्वसन करावे या मागणीसाठी बुधवारी हे विस्थपित एमएआरडीए कार्यालयावर धडकले. जोपर्यंत एमएमआरडीए पुनर्वसनाचे ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत येथून हटणार नाही, अशी भूमिका घेत हे विस्थापित बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

आणिक पांजरपोळ लिंक रोड प्रकल्पासाठी येथील झोपडपट्टी वासीयांचे विस्थापन करण्यात आले. या विस्थापितांचे एमएमआरडीएकडून पुनर्वसन करण्यात येणार होते. त्यानुसार काही विस्थापितांचे पुनर्वसन एमएमआरडीएने केले. पण अजूनही 2000 विस्थापित पुनर्वसनापासून वंचित असल्याचा आरोप आंदोलनकर्ते मोतीराम खरात यांनी केला आहे. पुनर्वसनासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत, मोर्चा काढत आहोत, पण एमएमआरडीए मात्र याकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे आता आम्ही बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतल्याचे खरात यांनी सांगितले.

सध्या या 2000 राहिवाशांना घरे नसल्याने काहीजण नातेवाईकांकडे तर काहीजण भाड्याने राहत आहेत. त्यामुळे किती दिवस या विस्थापितांनी असे वाऱ्यावर राहायचे? असा सवाल करत या विस्थापितांनी एमएमआरडीए विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर मागणी मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार ही यावेळी उपोषणास बसलेल्यांनी केला आहे. एमएमआरडीएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र हे रहिवाशी विस्थापित नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नच येत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे. आंदोलनकर्त्यांनी मात्र एमएमआरडीए खोटे बोलत असून, दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे.

Loading Comments