जनतेच्या पैशातून नगरसेवकांना मोबाईल कशाला? प्रस्ताव फेटाळला

महापालिकेच्या २२७ नगरसेवक आणि ५ नामनिर्देशित सदस्य अशा २३२ नगरसेवकांना महापालिकेच्या निधीतून मोबाईल फोन खरेदी करून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीला आला होता.

  • जनतेच्या पैशातून नगरसेवकांना मोबाईल कशाला? प्रस्ताव फेटाळला
SHARE

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मोबाईल व सिमकार्ड देण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत फेटाळण्यात आला. करदात्यांच्या पैशातून नगरसेवकांना मोबाईल फोन द्यायची गरज काय? असा सवाल करत या प्रस्तावाला भाजपाने तीव्र विरोध केला. याला सर्वच पक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा दिल्यानंतर महापौरांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. मागील महापालिकेत मनसेचे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी या दोघांनी मोबाईल फोन नाकारले होते.


'नगरसेवकांकडे आधीच मोबाईल आहेत!'

महापालिकेच्या २२७ नगरसेवक आणि ५ नामनिर्देशित सदस्य अशा २३२ नगरसेवकांना महापालिकेच्या निधीतून मोबाईल फोन खरेदी करून उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महापौरांच्या अध्यक्षतेखालील गटनेत्यांच्या सभेपुढे मंजुरीला आला होता. या प्रस्तावावर बोलताना भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी तीव्र आक्षेप घेतला. महापालिकेच्या प्रत्येक नगरसेवकाकडे मोबाईल फोन आहेत. मग करदात्यांच्या पैशातून अजून मोबाईल फोन का खरेदी करून द्यायचा? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे अशा प्रकारे मोबाईल फोन देण्यात येऊ नयेत, अशी मागणी त्यांनी केली.कोटक यांच्या मागणीला विरोधी पक्षनेते रवी राजा, सभागृहनेते यशवंत जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे रईस शेख, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांच्यासह सर्वच गटनेत्यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा प्रस्ताव नामंजूर केला.


टॅबही नाकारणार नगरसेवक

लॅपटॉपऐवजी नगरसेवकांना यावेळी टॅब देण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्तावही लवकरच गटनेत्यांच्या मान्यतेसाठी मांडला जाणार आहे. मात्र, मोबाईल फोनप्रमाणेच टॅबचाही प्रस्ताव अशाच प्रकारे फेटाळला जाण्याची शक्यता वर्तवली आहे. भाजपाचे मनोज कोटक यांनी ज्यावेळी याबाबचा प्रस्ताव येईल, तेव्हा मोबाईल फोनप्रमाणे तोही फेटाळून करदात्यांच्या पैशातून टॅब खरेदी करू दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट केले.हेही वाचा

नगरसेवकांना लॅपटॉपऐवजी मिळणार टॅब!


संबंधित विषय
ताज्या बातम्या