
मुंबई उपनगरांमध्ये मंगळवारी मध्यरात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी पुढील काही दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे.
तथापि, आज (1 जुलै) मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
IMD च्या जिल्हानिहाय अंदाजानुसार, शुक्रवारपर्यंत मुंबईत तुरळक ते काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. आज पावसाच्या तीव्रतेत काहीशी घट होण्याची शक्यता असली तरी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, पालघर जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तेथे अतिमुसळधार पाऊस आणि वादळी वातावरणाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रायगड जिल्ह्यासाठी सलग पाच दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एकीकडे मुसळधार पावसाचा इशारा असतानाच, दुसरीकडे मुंबईवर पाणीटंचाईचे संकटही गडद होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील एकूण उपयुक्त पाणीसाठा ७ टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने आणि अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे.
हेही वाचा
