मुंबईत सोमवारी सकाळी पावसानं चांगली हजेरी लावली. त्यामुळं मागील आठवड्याभरापासून उकाड्याचा सामना करत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला. त्याशिवाय राज्यभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मागील २४ तासांत मुंबई, ठाण्यासह लगतच्या प्रदेशात ५० मिलिमीटरपासून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
मुंबईत आतापर्यंत १०२.०४ टक्के पाऊस कोसळला आहे. मागील २४ तासांत पडणाऱ्या पावसामुळं पडझड सुरूच असून, ७ ठिकाणी झाडे कोसळली तर, २ ठिकणी शॉर्ट सर्किट झाले. दरम्यान, परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, शुक्रवारपासून मुंबई आणि परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाल्याने मुंबईकरांना थोडाफार दिलासा मिळाला.
मुंबईत सोमवारी पावसाचा अधूनमधून जोर राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात मुसळधार पाऊस पडेल पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही आयएमडीने व्यक्त केला आहे.
याआधी आॅगस्ट महिन्यात मुंबईकरांनी मुसळधार पावसाचा अनुभव घेतला. एवढंच नाही, तर आॅगस्टमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाने १९५८ पासूनचे मागचे अनेक विक्रम मोडीत काढले.
आॅगस्ट १९५८ मध्ये सांताक्रूझ वेधशाळेने १२५४ मिमी पावसाची नोंद केली होती. परंतु आॅगस्ट २०२० मध्ये १,२४८ मिमी पावसाची नोंद करताना अवघा ६.३ मिमी पाऊस हा विक्रम मोडण्यासाठी कमी पडला. मात्र या पावसाने आॅगस्ट १९८३ मधील १२४४ मिमी पावसाचा विक्रम मोडीत काढला.