एका दिवसातच अंधार दूर! भांडुप-मुलुंड, ठाणे शहरातील लोडशेडिंग मागे


SHARE

एेन दिवाळीच्या तोंडावर महावितरणने गुरूवारपासून मुलुंड-भांडुपसह राज्यभर अडीच ते दहा तासांचे लोडशेडिंग सुरू केले आहे. महावितरणाच्या या निर्णयावर सर्वच स्तरातून जोरदार टीका होत आहे. या टीकेनंतर महावितरणने मुलुंड-भांडुप, ठाणे शहरासह अ आणि ब क्षेत्रातील लोडशेडिंग शुक्रवारी मागे घेतले. लोडशेडिंगमुळे दिवाळी अंधारात जाणार काय? आॅक्टोबर हिटने लाही-लाही होणार का? या विचारानेच हवालदिल झालेल्या भांडुप-मुलुंडकर आणि ठाणेकरांना अखेर दिलासा मिळाला आहे.


अचानक अंधार

आॅक्टोबर हिटचे चटके बसण्यास सुरूवात झाल्याबरोबर महावितरणने सुमारे २ हजार २०० मेगावॅट विजेची टंचाई असल्याचे म्हणत गुरूवारपासून राज्यभर लोडशेडिंग सुरू केले. त्याचा फटका मुंबईतील भांडुप आणि मुलुंड या मध्य उपनगरांनाही बसला. भांडुप आणि मुलुंडमध्ये गुरूवारी अडीच तास लोडशेडिंग झाले नि हा परिसर अंधारात गेला. तर ठाणे शहरालाही लोडशेडिंगमुळे अंधारात रहावे लागले.


नाराजीची धार

एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी 'सौभाग्य योजना' जाहीर करत प्रत्येक घरात मोफत वीज देण्याचे आश्वासन देतात, त्याला १५ दिवसही उलटत नाहीत तोच राज्यात लोडशेडिंग सुरू झाल्याने सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. महावितरणने मात्र वीज टंचाईमुळे लोडशेडिंगशिवाय पर्याय नसल्याचे म्हणत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पुरेसा कोळसा नसल्याने चार वीज केंद्र बंद असल्याने २ हजार मेगावॅट विजेची टंचाई निर्माण झाल्याने एेन दिवाळीत आणि आॅक्टोबर हिटचे चटके बसत असताना महावितरणने राज्यातील जनतेला लोडशेडिंगचा शाॅक दिला आहे.


अल्पकालीन कराराद्वारे वीज खरेदी

पण, अखेर भांडुप-मुलुंड, ठाणे शहर, पुणे शहर, नाशिक शहरसारख्या अ आणि ब क्षेत्रातील लोडशेडिंग मागे घेतले आहे. विजेची टंचाई दूर करण्यासाठी महावितरणने अल्पकालीन कराराद्वारे ७०० मेगावॅट वीज खरेदी केली आहे. त्यामुळे भांडुप-मुलुंड, ठाणे शहरासह इतर शहरातील लोडशेडिंग मागे घेण्यात आल्याची माहिती महावितरणचे मुख्य जनसंपर्क अधिकारी पी. एस. पाटील यांनी मुंबई लाइव्हला दिली.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय