Advertisement

एमएमआरसीच करते वीज चोरी?


एमएमआरसीच करते वीज चोरी?
SHARES

कुलाबा-वांद्रे-सिप्झ मेट्रो-3 सुमारे 23 हजार कोटींचा प्रकल्प. पण या एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या कामासाठी चोरीची वीज वापरली जात असल्याची धक्कादायक माहिती नुकतीच समोर आली आहे. आरे येथील मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन(एमएमआरसी)च्या साईट ऑफिससाठी चक्क रस्ता ओलांडून आरे सरिता स्टॉलवरून चोरून वीज घेण्यात आल्याचा पर्दाफाश नुकताच 'सेव्ह आरे'च्या कार्यकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, याप्रकरणी 'सेव्ह आरे'कडून आरे मिल्क कॉलनीच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून एमएमआरसीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

रस्त्यावर लोंबकळणाऱ्या वायरमुळे एखाद्याचा जीव धोक्यात आला, तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे त्वरीत गुन्हा दाखल झाला पाहिजे. जर आरे मिल्क कॉलनीकडून याप्रकरणी येत्या काही दिवसांंत गुन्हा दाखल झाला नाही आणि ही चोरीची वीज जोडणी त्वरीत खंडीत करण्यात आली नाही तर आम्ही हे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादासमोर ठेवणार आहोत.

बीजु अगस्तीन, सदस्य, सेव्ह आरे


बेकादेशीर कामाला अभय?

आरेतील 33 हेक्टर जागेवर मेट्रो-3 च्या कारशेडसह इतर बांधकाम केले जाणार आहे. मात्र या कामाला 'सेव्ह आरे'ने विरोध करत राष्ट्रीय हरित लवादाकडे धाव घेतली आहे. तर आरेचा परिसर ना विकास क्षेत्रात येत असल्याने येथे कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नसल्याचे म्हणत लवादाने येथे बांधकाम करण्यास स्थगिती दिली आहे. असे असतानाही एमएमआरसीकडून गेल्या कित्येक महिन्यांपासून बेकायदेशीररित्या बांधकाम सुरू करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप 'सेव्ह आरे'कडून करण्यात येत आहे.

बांधकामास स्थगिती असतानाही सर्वेक्षणाच्या कामाचा घाट एमएमआरसीकडून घातला जात आहे. त्यामुळे आता वीज चोरीसह एमएमआरसीच्या सर्वच बेकायदेशीर कामांबाबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

आशिष पाटील, स्थानिक मनसे कार्यकर्ते


दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

आरेतील पिकनिक स्पॉटनजीक एमएमआरसीचे साईट ऑफिस आहे. या साईट ऑफिससाठी येथील आरे सरिता मिल्क स्टॉलमधून चोरून वीज घेण्यात आल्याचे 'सेव्ह आरे'च्या लक्षात आले. यामुळे मोठी दुर्घटनाही घडण्याची शक्यता व्यक्त करत 'सेव्ह आरे'ने यावर आक्षेप घेतला आहे. ही बाब गेल्या आठवड्यात लक्षात आल्याबरोबर आरे मिल्क कॉलनीचे मुख्य अधिकारी नाथू राठोड यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती 'सेव्ह आरे'चे कार्यकर्ते बिजु अगस्तीन यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.

अधिकाऱ्यांना यासंबंधीची पाहणी, चौकशी करत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतरच पुढील कार्यवाही होईल.

नाथू राठोड, मुख्य अधिकारी, आरे मिल्क कॉलनी

आरे ना विकास क्षेत्र परिसरात मोडत असल्याने येथे वीज जोडणी करून घेणे अत्यंत अवघड बाब आहे. त्यासाठी आरे मिल्क कॉलनीच्या मुख्य अधिकाऱ्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. मात्र सध्या आरेचे प्रकरण राष्ट्रीय हरित लवादात असल्याने आरे मिल्क कॉलनी लवादाकडून परवानगी आणण्यास सांगत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वीज, पाणी जोडणी वा इतर कामांसाठी आरेत मोठ्या अडचणी येताना दिसतात. दरम्यान, एमएमआरसीच्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला पण त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.



हेही वाचा

एमएमआरसीकडून सीआरझेडचे उल्लंघन?


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा