एमएमआरसीकडून सीआरझेडचे उल्लंघन?

 Cuffe Parade
एमएमआरसीकडून सीआरझेडचे उल्लंघन?
Cuffe Parade, Mumbai  -  

कफ परेड - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी)ला एमसीझेडएम (महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेन्ट अथॉरिटी)ने कफ परेड येथील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील रस्त्यावर मेट्रो-3 च्या बांधकामासाठी परवानगी दिली आहे. त्या परवानगीाचे प्रतिज्ञापत्र नुकतेच एमसीझेडएमकडून उच्च न्यायालयात सादर करण्यात आले आहे. मात्र मेट्रोकडून पेठे मार्गालगतच्या चिल्ड्रन पार्कमध्ये जे काम सुरू आहे त्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याचे या प्रतिज्ञापत्रातून एमसीझेडएमने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विना परवानगी असे काम करणे म्हणजे सीआरझेडचे उल्लंघन असल्याचेही या प्रतिज्ञापत्रात एमसीझेडएमने नमूद केल्याची माहिती सेव्ह ट्रीचे रॉबिन जय सिंघानिया यांनी दिली आहे.

पेठे मार्गावरील रस्त्यावर बांधकामासाठी परवानगी असताना एमएमआरसीकडून चिल्ड्रन पार्कमध्ये बेकायदा मेट्रो-3 चे काम केले जात असल्याचे म्हणत सेव्ह ट्री ग्रुपमधील काही सदस्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा परिसर सीआरझेडमध्ये येत असून एमसीझेडएमने केवळ रस्त्यावर बांधकामास परवानगी दिल्याचेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या बुधवारी झालेल्या सुनावणीत एमसीझेडएमने एक प्रतिज्ञापत्र सादर केले असून या प्रतिज्ञापत्राद्वारे चिल्ड्रन पार्कवरील बांधकाम बेकायदा असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मेट्रो-3 कडून जी काही कामे केली जात आहेत, ती कायद्याला धरून सर्व परवानग्या घेऊनच केली जात असल्याचा दावा न्यायालयात केला जात आहे. त्यानुसार न्यायालयाने सर्व परवानग्या सादर करण्याचे आदेश 50 दिवसांपूर्वी एमएमआरसीला दिले आहेत. पण 50 दिवस झाले तरी एमएमआरसी एकही कागदपत्र, परवनागी सादर करु शकलेली नाही. एमएमआरसी सातत्याने कागदपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ मागत आहे. त्यामुळे एमएमआरसीच्या भूमिकेबाबत शंका निर्माण होत असल्याचेही जय सिंघानिया यांनी स्पष्ट केले आहे. तर एमसीझेडएमच्या प्रतिज्ञापत्रावर आता न्यायालय का निर्णय घेते हेच पाहणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Loading Comments