Advertisement

मुंबईतील हवेची पातळी खालावली

मुंबईतील हवेचा निर्देशांक बुधवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदवला असून शिवडी, वरळी तसेच वांद्रे – कुर्ला संकुल येथे हवेच्या खालच्या पातळीची नोंद झाली.

मुंबईतील हवेची पातळी खालावली
SHARES

मुंबईतील (mumbai) हवेचा निर्देशांक बुधवारी सकाळी मध्यम श्रेणीत नोंदवला असून शिवडी (sewri), वरळी (worli) तसेच वांद्रे – कुर्ला संकुल येथे हवेच्या खालच्या पातळीची नोंद झाली. मुंबईतील हवेची गुणवत्ता (air quality) मंगळवारीही मध्यम श्रेणीत होती. ‘समीर’ ॲपनुसार बुधवारी सकाळी मुंबईच्या हवेचा निर्देशांक 114 वर पोहोचला होता.

समीर ॲपच्या नोंदीनुसार, बुधवारी सकाळी शिवडी येथील हवा निर्देशांक 226, तर वरळी येथील 225 इतका होता. तसेच खेरवाडी-वांद्रे 205, वांद्रे -कुर्ला संकुल हवा निर्देशांक 225 इतका होता. दरम्यान, मंगळवारी देखील सायंकाळी हवा मध्यम श्रेणीत नोंदवली गेली होती.

केंद्रीय प्रदूषण (pollution) नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांकातील 0-50 म्हणजे चांगले, 51-100 समाधानकारक, 101-200 मध्यम, 201-300 वाईट, 301-400 अत्यंत वाईट आणि 400 पेक्षा जास्त म्हणजे अतिधोकादायक समजली जाते.

भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरासाठी दैनंदिन अंदाजामध्ये सकाळी धुके पडण्याची शक्यता आणि मुख्यतः निरभ्र आकाश असण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. तर, किमान तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान ,पावसाळ्यानंतर मुंबईतील वाऱ्यांची स्थिती बदलते, वेग मंदावतो. त्यामुळे हवेत साचलेल्या धूळीचा निचरा होत नाही. बाष्पामुळे धुलीकण हवेतच तरंगत राहतात. या नैसर्गिक कारणांबरोबच अनेक मानवनिर्मित कारणेही मुंबईच्या प्रदूषणात भर घालत आहेत.

पायाभूत सुविधा, रहिवासी व व्यावसायिक संकुले, नवे प्रकल्प यांची बांधकामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यातून उडणारी धूळ हवेचा दर्जा ढासळण्यास कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरांमध्ये अतिसूक्ष्म कण असतात. हे कण एकत्र येऊन वातावरणातील प्रदूषण वाढविण्यास कारणीभूत ठरतात.

प्रदूषणामुळे श्वसन आणि त्वचेशी संबंधित आजार उद्भवतात. सकाळी आणि सायंकाळी धुक्याचे प्रमाण जास्त असते. अशा वेळी घराबाहेर पडणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. थंड पेय, तेलकट पदार्थ वर्ज्य करावे. लहान मुले, वयोवृद्ध यांच्यासाठी हे वातावरण धोकादायक असल्याने त्यांनी विशेष काळजी घ्यावी.



हेही वाचा

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी 80 कोटी रुपयांची तरतूद

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा