Advertisement

आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष रहा, मुंबई जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रेल्वे, बस, आरोग्य विभागाला सूचना

संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी आढावा घेतला.

आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष रहा, मुंबई जिल्ह्याधिकाऱ्यांच्या रेल्वे, बस, आरोग्य विभागाला सूचना
SHARES

संभाव्य निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या विभागांमार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा मुंबई जिल्हाधिकारी राजीव निवतकर (mumbai district collector rajiv nivatkar held a meeting ahead of cyclone nisarga) यांनी मंगळवार २ जून रोजी आढावा घेतला. या आढाव्यानंतर त्यांनी मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना केल्या.

दक्ष राहण्याच्या सूचना

निसर्ग चक्रीवादळ बुधवार ३ जूनच्या सुमारास महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रेल्वे, बेस्ट, महसूल, आरोग्य आदी महत्त्वाच्या  विभागासोबत  संभाव्य वादळाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुंबई शहरातील महसूल व अन्य महत्त्वाच्या विभागांनी आपत्कालीन व्यवस्थेसह दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा- निसर्ग चक्रीवादळ: प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचं आवाहन

९ गट तयार

रेल्वेची वाहतूक ही बुधवारी असणाऱ्या वाऱ्याचा वेग तसंच त्या अनुषंगाने इतर सूचनांवर अवलंबून असेल. त्याचप्रमाणे कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळात तात्पुरत्या स्वरुपात उभ्या केलेल्या  रुग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या. संभाव्य वादळाने होणाऱ्या नुकसानीची मोजणी तसंच मदत कार्यासाठी उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, नायब तहसिलदार यांचे  ९ गट  तयार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

या बैठकीत अपर जिल्हाधिकारी अभंग,निवासी उपजिल्हाधिकारी संपत डावखर तसंच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

एनडीआरएफ तैनात

दरम्या, ज्या व्यक्ती कच्च्या घरात राहत आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत दवंडी व लाऊडस्पीकरद्वारे सांगण्यात आलं आहे. यासाठी पक्की निवारागृहे देखील तयार ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांना समुद्रातून बोलविण्यात आलं असून तटरक्षक दलाला देखील सूचना देण्यात आली आहे. वादळामुळे झाडे पडणे, भूसख्खलन, जोरदार पाऊस यामुळे हानी होण्याची शक्यता घेऊन प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रातील विशेषत: सखल भागातील  झोपडपट्टीवासियांना देखील स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकड्यांपैकी १० तुकड्या तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या ६ तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसंच पालघर आणि रायगड मधील रासायनिक कारखाने, अणू ऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा