Advertisement

खासगी इमारतींची झाडे छाटण्यास प्रशासन अनुत्सुक


खासगी इमारतींची झाडे छाटण्यास प्रशासन अनुत्सुक
SHARES

मुंबईत पावसाळ्यात रस्त्यालगतची तसेच खासगी इमारतीच्या आवारातील झाडे पडून तसेच त्यांच्या फांद्या पडून होणाऱ्या दुघर्टनांचं प्रमाण आता वाढू लागलंय. आतापर्यंत झाडाची फांदी पडून मृत्यू पडलेल्यांची संख्या ७ वर पोहोचलेली असून उद्यान विभाग मात्र झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासंदर्भात तेवढे गंभीर दिसत नाही. खासगी इमारतींच्या आवारातील झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी येणारं शुल्क माफ करण्याची मागणी नगरसेवकांकडून वारंवार होऊनही प्रशासन मात्र त्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणीसाठी शुल्क आकारण्यावर ठाम आहे.


विनाशुल्क छाटणीची मागणी

मुंबईत गेल्या काही दोन ते तीन महिन्यांमध्ये झाड उन्मळून पडून किंवा त्यांची फांदी तुटून दुर्घटना होण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उद्यान विभागाला टिकेचं धनी व्हावं लागत आहे. रस्त्यालगत महापालिकेच्या जमिनींवरील धोकादायक झाडं आणि झाडांच्या धोकादायक फांद्या कापल्या जातात. परंतू खासगी इमारतीच्या आवारातील तसेच वस्त्यांमधील अशाप्रकारची झाडं कापण्यासाठी प्रत्येक झाडामागे दोन ते तीन हजार रुपयांचं शुल्क आकारलं जातं. त्यामुळे हे शुल्क रद्द करून निशुल्कपणे धोकादायक झाडं आणि धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याची मागणी वारंवार केली जात आहे.


सोसायटीला परवडणारं नाही

महापालिकेच्या  ऑगस्ट महिन्याच्या कार्यक्रमपत्रिकेवर याबाबत भाजपाचे नगरसेवक प्रभाकर शिंदे आणि भाजपा नगरसेविका रजनी केणी यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे अशाप्रकारची मागणी करून पुन्हा एकदा प्रशासनाचं लक्ष वेधलं आहे. प्रभाकर शिंदे यांनी याबाबतचं धोरण बनवण्याची मागणी केली आहे. तर रजनी केणी यांनी ही छाटणी विनाशुल्क करण्याची मागणी केली आहे. खासगी इमारती किंवा वस्त्यांमधील धोकादायक झाडं अथवा झाडाची धोकादायक फांदी छाटणीची जबाबदारी कोणी घ्यावी यावरूनच वाद असून जर एकाच झाडासाठी एवढे पैसे मोजले जात असतील तर पाच ते दहा झाडांची करावी लागल्यास त्याप्रमाणे पैसे भरणे हे कोणत्याही सोसायटीला परवडणारं नाही. त्यामुळे पहिल्या झाडासाठी जर हा दर लावला जात असेल तर पुढील प्रत्येक झाडांच्या संख्येप्रमाणे तो दर कमी कमी केला जावा, अशी सूचना काही खासगी स्वयंसेवी संस्थांकडून मांडली जात आहे.


ट्री टॅक्स लावा

मुंबईकरांच्या जिविताचं रक्षण करून त्यांच्या सुरक्षितेतचा जेव्हा विचार होतो, तेव्हा खासगी किंवा महापालिका परिसर हा भेदभाव करणं योग्य नसून शेवटी तो करदाता आहे, हे महापालिकेनं विसरू नये. तर काही संस्थांनी, ट्री टॅक्स वसूल करा, पण खासगी वसाहतीतील धोकादायक झाडं तोडा, अशीही सूचना केली आहे.



हेही वाचा -

मुलुंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तरूण जखमी

शिक्षकांच्या खांद्यावरील भार घटणार : ११८२ लिपिकांची होणार नेमणूक




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा