Advertisement

शिक्षकांच्या खांद्यावरील भार घटणार, ११८२ लिपिकांची होणार नेमणूक


शिक्षकांच्या खांद्यावरील भार घटणार, ११८२ लिपिकांची होणार नेमणूक
SHARES

मुंबई महापालिका शाळांमध्ये लिपिकांची कामं शिक्षकांनाच करावी लागत असून आता मात्र या शिक्षकांना लिपिकांची कामे करण्याची गरज भासणार नाही. शिक्षकांना आता ज्ञानार्जनाचंच काम नीटपणे करता येणार अाहे. महापालिकेच्या शाळांसाठी एकूण ११८२ लिपिकांची पदे निर्माण करण्यात येत आहेत. शिक्षण विभागानं याबाबतचा प्रस्ताव मंजूर केला असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाहीला सुरुवात केली जाणार आहे.


वारंवार तीव्र नाराजी

मुंबई महापालिकेच्या प्राथमिक व विनाअनुदानित माध्यमिक एमपीएसच्या एकूण १२०६ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये लिपिकांची कामे करण्यासाठी कर्मचारी वर्ग नसल्यानं ती कामे शिक्षकांना करावी लागतात. याबाबत शिक्षण समितीच्या बैठकीत वारंवार तीव्र नाराजी व्यक्त करून शिक्षकांना लिपिकांच्या कामांमधून मुक्त करण्याची मागणी होत असे. त्यामुळे माजी शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुढेकर यांनी हा मुद्दा हाती घेऊन थेट महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा करून लिपिकांची पदे निर्माण करण्याबाबत पाठपुरावा केला.

प्रशासकीय मान्यतेनंतर कार्यवाही

महापालिका आयुक्तांनी हा मुद्दा मान्य केल्यानंतर शिक्षण विभागानंही पाऊल उचललं आहे. महापालिका शाळांमध्ये ११८२ लिपिकांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव असून प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असं शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केलं. यापूर्वी लिपिकांची पदे नव्हती. त्यामुळे ही पदे निर्माण करण्यास आम्ही मान्यता मागितली आहे. त्याला मान्यता मिळाल्यांनतर ही पदे कशाप्रकारे भरता येईल याचा विचार केला जाईल. लिपिकांची भरती करावी कि अन्य खात्यांमधून लिपिकांची नियुक्ती केली जावी, याचा निर्णय नंतर घेतला जाईल,असेही त्यांनी सांगितले.


डेटा ऑपरेटर्स नकोत

महापालिकेच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांची ऑनलाईन कामं करण्यासाठी डेटा ऑपरेटर यांची तातडीनं नेमणूक करण्याची मागणी मुंबई महापालिका शिक्षण सेनेचे कार्याध्यक्ष के.पी.नाईक यांच्याकडून होत होती. याच सूचनेनुसार नगरसेविका प्रज्ञा दीपक भूतकर यांनी मागील नोव्हेंबर महिन्यात शिक्षण समितीच्या बैठकीपुढे ठरावाच्या सूचनेद्वारे या मागणीकडे लक्ष वेधले होते. परंतू लिपिकांचीच नेमणूक करण्यात येत असल्यामुळे डेटा ऑपरेटर्सची नेमणूक करणं योग्य ठरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.

महापालिकेच्या एकूण शाळा   :    १२०६
एकूण विद्यार्थी संख्या           :    ३,०६,४४६
शिक्षकांची संख्या                 :   १०,६३६



हेही वाचा - 

खोटी माहिती देणाऱ्या शाळांविरोधात आता होईल कारवाई

कोळीणींना नगरसेवक निधीतून बॉक्स द्या; सेना- भाजपाचीही मागणी




Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा