Advertisement

उपायुक्त विजय बालमवार यांची पुन्हा बदली


उपायुक्त विजय बालमवार यांची पुन्हा बदली
SHARES

मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार यांची बदली अवघ्या काही महिन्यांमध्ये पुन्हा  करण्यात आली आहे. परिमंडळ एकच्या उपायुक्तपदावरून त्यांची बदली करनिर्धारण व संकलन तथा निवडणूक या खात्याच्या उपायुक्तपदी करण्यात आली आहे. बालमवार हे सध्या महापालिकेतील राजकारणाचे बळी ठरत असल्याची चर्चा महापालिकेत ऐकायला मिळत आहे.


अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्तपदी असलेल्या विजय बालमवार यांची काही महिन्यांपूर्वीच परिमंडळ १ मध्ये बदली करण्यात आली होती. परंतू, शुक्रवारी पुन्हा त्यांची बदली करून त्यांच्याकडे परिमंडळ १ ऐवजी करनिर्धारण व संकलन विभागाचा पदभार सोपवण्यात आला.  करनिर्धारण व संकलन विभागाचे पदभार सांभाळणाऱ्या उपायुक्त हर्षद काळे यांना त्यांच्या जागी पाठवण्यात आलं आहे. शुक्रवारी तडकाफडकी निघालेल्या आदेशामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.


कर्तबगारीला मारण्याचा प्रयत्न 

महापालिकेचा जकात कर आणि मालमत्ता कर तसेच निवडणूक विभाग हे करनिर्धारण व संकलन विभागात येतात. परंतू, जकात नाकेच बंद झाल्यामुळे वसूल होणारा कर बंद झाला आहे. तर मालमत्ता कर हा या विभागाचा भाग असला तरी तो अद्यापही सहायक आयुक्त देवीदास क्षिरसागर यांच्याकडे आहे. त्यामुळे निवडणूक विभाग हा एकमेव करनिर्धारण व संकलनात येत असून त्यामुळे उपायुक्त हर्षद काळे हे हवालदिल झाले होते.

 याठिकाणी काहीच काम नसून केवळ दिवसभर बसण्यापेक्षा हाताला काम द्या, अशीच माफक अपेक्षा अनेकदा काळे यांच्याकडून व्यक्त केली जात होती. मात्र, आता काळे यांना परिमंडळ एकमध्ये पाठवून बालमवार यांच्यासारख्या हुशार अधिकाऱ्यांना त्यांच्या पदावर बसवून त्यांच्यातील कर्तबगारीला मारण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून होत असल्याचं बोललं जात आहे.


राजकारणाचा बळी

बालमवार हे परिमंडळ एकच्या उपायुक्तपदी असताना ए ते ई वॉर्डमध्ये सहायक आयुक्त, पदनिर्देशित अधिकारी असलेले कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता अशी पदे न भरता त्यांना प्रशासनतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर नामोहरम करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे प्रशासनातील अंतर्गत राजकारणाचा बळी सध्या बालमवार ठरत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.



हेही वाचा -

याला वॉटरफॉल म्हणावे की दारूचे अड्डे?

बेस्टनं पकडले १० हजार फुकटे प्रवासी, ९ लाखांचा दंड वसूल




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा