Advertisement

मुंबई BMC मध्ये 23 मे रोजी सकाळी 11 वाजल्यानंतर नो एन्ट्री

G20 परिषदेच्या आपत्ती निवारण कार्यगटाचे एक शिष्टमंडळ मंगळवारी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाला भेट देणार आहे.

मुंबई BMC मध्ये 23 मे रोजी सकाळी 11 वाजल्यानंतर नो एन्ट्री
SHARES

मुंबईत 23 ते 25 मे दरम्यान जी-20 परिषद होत आहे. परिषदेच्या प्रतिनिधींच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. मंगळवारी 23 मे रोजी 20 देशांतील 120 प्रतिनिधी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात हेरिटेज वॉक करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर पालिका मुख्यालयातील कर्मचार्‍यांना महापालिका प्रशासनाने मंगळवार, 23 मे रोजी हाफ डे जाहीर केला आहे.

अभ्यागतांना सकाळी 9.45 ते 11 या वेळेत प्रवेश दिला जाणार असून, 11 नंतर अभ्यागतांना पालिका मुख्यालयात प्रवेश करता येणार नाही.

जी-20 देशांच्या गटांच्या अध्यक्षपदाचा बहुमान यंदा भारताला मिळाला आहे. त्याचअंतर्गत देशातील विविध शहरांमध्ये निरनिराळ्या विषयांवर जी-20 देशांच्या कार्यगटांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे.

मुंबईत तिसर्‍यांदा 23 ते 25 मे दरम्यान जी-20 परिषद संपन्न होणार असून, पालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक करणार्‍या 120 प्रतिनिधींना शाही मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी पालिका मुख्यालय परिसरात येणे टाळावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

परिषदेच्या निमित्ताने जी-20 कार्यगटाचे प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका मुख्यालयास भेट देणार आहेत. या भेटीच्या अनुषंगाने महानगरपालिका मुख्यालयातील कर्मचार्‍यांना 23 मे रोजी दुपारी 2 वाजता अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. ज्या विभागातील किंवा खात्यातील कर्मचारी यांचे उपस्थित असणे गरजेचे आहे, अशा कर्मचार्‍यांना मुंबई पोलीसांमार्फत पास देण्यात येणार आहेत.

मात्र, पोलिसांकडून प्राप्त झालेला पास नसलेल्या कर्मचार्‍यांना महानगरपालिका इमारतीत थांबण्यास पोलिसांमार्फत मज्जाव करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जी-20 देशांच्या ’आपत्कालीन जोखीम सौम्यीकरण’ या विषयावरील कार्यगटाची बैठक मुंबईमध्ये मंगळवार ते गुरुवार या कालावधीत होणार आहे. महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन आपत्कालीन यंत्रणा, कामकाज आदींबाबत शिष्टमंडळाचे सदस्य माहिती जाणून घेतील, अशी माहिती सहआयुक्त (सामान्य प्रशासन ) मिलीन सावंत यांनी दिली.



हेही वाचा

मुंबईतील रस्त्यांवर ४ महिने खोदकाम करण्यास बंदी

ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी! रस्त्यांची 60% ते 70% कामे पूर्ण

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा