Advertisement

ही कसली स्वच्छता? गटारातील पाण्याने धुतल्या जाताहेत पोलिसांच्या गाड्या


ही कसली स्वच्छता? गटारातील पाण्याने धुतल्या जाताहेत पोलिसांच्या गाड्या
SHARES

गटारातील पाण्याने खासगी वाहने तसेच पोलिसांच्या गाड्या धूतल्या जात असतानाचा व्हायरल व्हिडिओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा व्हिडिओ माटुंगा रोड स्टेशन जवळील सेनापती बापट मार्गावरील आहे. माजी महापौर आणि शिवसेना नगरसेवक तथा जी /उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष मिलिंद वैद्य यांनी गटारातील पाण्याने गाड्या धुतल्याने पसरणारी अस्वछता आणि गाडी धुणाऱ्यांना असलेली पोलिसांची साथ या व्हिडिओद्वारे उघड केली आहे.


काय होता प्रकार?

सेनापती बापट मार्गावर हनुमान मंदिर आणि बिग बाजार समोर जलवाहिनीतील व्हॉल्वमधून निघणारं पाणी गटारात जमा होतं. या साचलेल्या पाण्याने याठिकाणी टॅक्सी, खासगी वाहने धुतली जातात. त्यासाठी सेनापती बापट मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जातात. परिणामी वाहतूककोंडी निर्माण होते. या पाण्याने रस्त्यावरही अस्वछता निर्माण होते.




रहिवाशांची तक्रार

याबाबत रहिवाशांच्या तक्रारी आल्यानंतर त्याची पाहणी करण्यास गेलेले नगरसेवक मिलिंद वैद्य यांना तिथे पोलिसांच्या गाड्या धुतल्या जात असल्याचं आढळून आलं. या प्रकाराचा व्हिडिओ काढून त्यांनी पोलिसांनाच जाब विचारत गाडी धुणाऱ्यालाही एक लगावली.


पोलिस कर्मचारी शांत

कुंपनच शेत खायला लागल्यावर आम्ही कुणाकडे दाद मागायची? असा सवाल करत वैद्य यांनी गाडी धुणाऱ्याला मारल्याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल करा, असंही पोलिसांना आव्हान दिल्याचं दिसतं. मात्र या संपूर्ण व्हिडिओत पोलीस कर्मचारी शांत असून केवळ त्यांची चूक असल्याने त्यांच्याकडून हे प्रकरण नरमाईने घेण्याचं आवाहन वैद्य यांना केलं जात होतं.


कारवाईची मागणी

दरम्यान, मिलिंद वैद्य यांनी स्थायी समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुद्द्याद्वारे माटुंगा रोड रेल्वे स्थानकाबाहेर सेनापती बापट मार्गावर गाड्या धुणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या याबाबतचा जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो आपलाच आहे. पोलिसांच्याही गाड्या तिथे धुतल्या जात असल्याने त्यांच्या संरक्षणातच हा धंदा सुरु असल्याचं दिसत आहे. रस्त्यावर गाड्या धुण्यास बंदी असतानाही महापालिकेचे क्लीन अप मार्शल वा इतर अधिकारी कोणतीही कारवाई करत नाही, याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा