Advertisement

मुंबई, पालघर, ठाणेसह ७ जिल्ह्यांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे


मुंबई, पालघर, ठाणेसह ७ जिल्ह्यांसाठी पुढील ३ तास महत्त्वाचे
SHARES

रविवारी रात्रीपासून राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. मोठ्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसानं दमदार हजेरी लावली असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. दरम्यान हवामान विभागानं पुढील ३ तास मुंबई, ठाणे, पालघरसह ७ जिल्ह्यांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. ७ जिल्ह्यात मध्यम ते अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

कोकणात बहुतांश भागात दमदार पावसानं दाणादाण उडवून दिली आहे. काही ठिकाणी गेल्या २४ तासांत २५० ते ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोमवारी संध्याकाळपर्यंत मुंबई परिसरासह रत्नागिरीत जोरदार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरलाही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

मराठवाड्यातील परभणी इथं गेल्या २४ तासांत या भागातील आजवरचा सर्वाधिक २३२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत झाले असून, ५ हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. सक्रिय झालेल्या झालेल्या पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार असून, पुढील तीन तासांत राज्यातील सात जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा ते तीव्र मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे.

मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

१५ जुलैपर्यंत पावसाचा अंदाज

१३ जुलै : रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अतिवृष्टी. पुणे जिल्हा घाटक्षेत्र, औरंगाबाद, जालना जोरदार पावसाची शक्यता.

१४ जुलै : मुंबई, पालघर, ठाणे, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जोरदार पावसाचा अंदाज. परभणी, हिंगोली, नांदेड हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस.

१५ जुलै : मुंबई, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, पुणे आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा