Advertisement

टिचभर पावसातच वरळी बीडीडीवासीयांचे हाल-हाल


टिचभर पावसातच वरळी बीडीडीवासीयांचे हाल-हाल
SHARES

बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत १०० वर्षे जुन्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडानं हाती घेतला आहे. त्यानुसार बीडीडीच्या जागी टोलेजंग टाॅवर उभे राहणार असून बीडीडीवासीय या टाॅवरमधील मोठ्या ५०० चौ. फुटाच्या फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहे. बीडीडीवासीयांना राज्य सरकार-म्हाडानं दाखवलेलं हे स्वप्न पूर्ण होईल तेव्हा होईल, पण सध्या, आजच्या घडीला वरळी बीडीडीतील बीडीडीवासीयांचे मात्र हालहाल सुरू आहेत. हे हाल केलेत पावसानं नि बीडीडीच्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी.


पावसाचं लाइव्ह अपडेट पाहण्यासाठी इथं क्लिक करा

कुठल्या इमारतींमध्ये काय स्थिती?

शनिवारी सकाळपासून मुंबईत पाऊस बरसत असून ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबईतील अनेक भाग, रेल्वेचे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. असं असताना वरळीतील बीडीडी चाळ क्रमाक ३८, ३९ आणि ४० क्रमांकाच्या इमारतीत पाणीच पाणी झालं आहे. १०० वर्षे जुन्या या इमारतींची दुरावस्था झाली असल्यानं पावसाच्या आधी टेरेसवर डांबरीकरण करून ताडपत्री टाकण्याचं काम केलं जातं.घरादारात पाणीच पाणी

पण, ३८, ३९ आणि ४० क्रमांकाच्या इमारतीची पावसाळ्यापूर्वी दूरूस्ती झाली नव्हती. त्यामुळं शनिवारी जोरदार पाऊस सुरू झाला आणि या तिन्ही इमारतीतील रहिवाशांच्या घरादारात पाणी शिरू लागलं. महत्त्वाचं म्हणजे इतर इमारतींचीही थोडीफार अवस्था अशीच आहे. घरा-घरात बादल्या, भांडी ठेवण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.इमारतींची दुरूस्ती झाली नाही

या तिन्ही इमारतीच्या टेरेसचं डांबरीकरण न झाल्यानं टेरेसमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असून इमारतीखालीही पाणीच पाणी झालं आहे. शेवटच्या मजल्यावर पाणी झालं असून घरांमध्येही पाणी शिरलं आहे. ४ महिन्यांपासून इमारतीखाली टेरेसच्या दुरूस्तीचा फलक लोकप्रतिनिधींनी लावला आहे. पण प्रत्यक्षात ही दूरूस्ती काहीही झालेलीच नाही. आम्ही लोकप्रतिनिधींच्या मागे लागून लागून थकलो, पण दुरूस्ती काही झालीच नाही, अशी माहिती इमारत क्रमांक ३९ मधील रहिवासी सूरज भिंगारे यांनी मुंबई लाइव्हला दिली आहे.
लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष

गेल्या ४ वर्षांपासून या तीन इमारतींच्या दुरूस्तीकडे लोकप्रतिनिधींकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप या इमारतीतील रहिवाशांनी केला आहे. गेल्या वर्षीही दुरूस्तीच्या नावावल मलमपट्टीच करण्यात आल्यानं पावसात आमचे हाल झाले होते नि यंदाही असेच हाल असल्याचंही भिंगारे यांनी म्हटलं आहे. रहिवाशांनी आता स्वतच्या खर्चातून दुरूस्तीचं काम हाती घेतलं असून पाऊस थांबल्यानंतरच दुरूस्ती करणं शक्य होणार आहे. त्यामुळं या रहिवाशांना पाऊस थांबेपर्यंत पाण्यात हाल सोसतच राहवे लागणार आहे.रहिवाशांनीच केला विरोध?

दरम्यान याविषयी स्थानिक आमदार सुनील शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाऊस थांबल्याबरोबर बीडीडीतील ज्या ज्या इमारतींना दुरूस्तीची आवश्यकता आहे त्या त्या इमारतींची त्वरीत दुरूस्ती करून देण्यात येणार असल्याचं आश्वासन 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिलं. या तीन इमारतींच्या दुरूस्तीला रहिवाशांनीच विरोध केल्यानं दुरूस्ती होऊ शकली नाहीत. त्यामुळंच असे हाल झाल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

तर, रहिवाशी मात्र लोकप्रतिनिधीच जाणिवपूर्वक दुरूस्तीकडं दुर्लक्ष करत असल्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. पण या वादात मात्र बीडीडीतील रहिवाशांचे मात्र हाल होत आहेत हे नक्की. तर सुरूवातीच्या पावसातच हे हाल आहेत, तर पाऊस वाढल्यानंतर, पुढच्या ४ महिन्यांत काय होणार याची कल्पनाही करायला नको.हेही वाचा-

फोर्टमधील कोठारी मेन्शनला आग, इमारतीचा भागही कोसळलाRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा