Advertisement

मुंबईतील गेल्या 3 वर्षांतील सर्वात कोरडा मे महिना

पावसाच्या कमतरतेमुळे उष्णतेतही वाढ झाली आहे.

मुंबईतील गेल्या 3 वर्षांतील सर्वात कोरडा मे महिना
SHARES

हवामान विभागाच्या India Meteorological Department (IMD) च्या आकडेवारीनुसार, मुंबईत गेल्या तीन वर्षांतील सर्वात कोरडा मे महिना नोंदवला गेला आहे. संपूर्ण महिनाभर उष्णता आणि कोरडे हवामान अनुभवलेल्या मुंबईला 31 मे रोजी झालेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला.

31 मे रोजी झालेल्या पावसामुळे मुंबईतील मासिक पावसाची नोंद 8.8 मिमीपर्यंत पोहोचली. मात्र यापूर्वी 1 मे ते 30 मेदरम्यान सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळांमध्ये मोजण्याजोगा पाऊसच पडला नव्हता.

22 मे रोजी विक्रोळी, कांजूरमार्ग आणि मुलुंडसह काही पूर्व उपनगरांमध्ये हलकी रिमझिम झाली होती. पण तो पाऊस मोजण्याइतका नसल्याने वेधशाळांमध्ये “शून्य” पावसाची नोंद करण्यात आली.

यंदाच्या मे महिन्याची परिस्थिती मागील वर्षांच्या तुलनेत खूप वेगळी होती. सांताक्रूझ वेधशाळेत मे 2025 मध्ये तब्बल 395 मिमी पावसाची नोंद झाली होती, तर मे 2024 मध्ये 21.3 मिमी पाऊस झाला होता.

यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यांतही सांताक्रूझ वेधशाळेत एकही मिमी पावसाची नोंद झाली नाही. मार्चपासून मुंबईत किमान सहा वेळा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. मार्च ते मे या कालावधीत सांताक्रूझ येथे 9.7 टक्के, तर कुलाबा येथे 15.5 टक्के पावसाची तूट नोंदवली गेली आहे.

सामान्यतः मार्च ते मे दरम्यान मुंबईत पूर्वमान्सून पाऊस आणि मेघगर्जनेसह सरी पडतात. मात्र यंदा शहरात संपूर्ण पूर्वमान्सून हंगाम कोरडाच राहिला. दुसरीकडे महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर आणि सातारा या भागांमध्ये 31 मेपर्यंत 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

पावसाच्या कमतरतेमुळे मुंबईतील तापमानातही वाढ झाली. 27 मे रोजी तापमान 39 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानंतर हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता.

दरम्यान, IMD ने देशातील मान्सूनसंदर्भातील अंदाजातही बदल केला आहे. यापूर्वी देशात सरासरीच्या 92 टक्के पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता तो कमी करून 90 टक्के करण्यात आला आहे.

हवामान विभागानुसार, एल निनोची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे नैऋत्य मान्सून कमकुवत होऊ शकतो. एल निनोमुळे प्रशांत महासागरातील समुद्राचे तापमान वाढते आणि भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढते.



हेही वाचा

यंदा मान्सून 10 जूननंतरच येण्याची शक्यता

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा