Advertisement

मुंबईतील वाहतूककोंडीवर आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' निर्देश

मुंबई उपनगरातील रस्त्यांच्या सुधारणांबाबत पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली.

मुंबईतील वाहतूककोंडीवर आदित्य ठाकरेंनी दिले 'हे' निर्देश
SHARES

मुंबईतील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांचा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. पश्चिम द्रुतगती महामार्ग (WEH), पूर्व द्रुतगती महामार्ग (EEH), एसव्ही रोड, लाल बहादूर शास्त्री मार्ग (एलबीएस रोड), अंधेरी – घाटकोपर लिंक रोड, जोगेश्वरी – विक्रोळी लिंक रोड (JVLR), सांताक्रूझ – चेंबूर लिंक रोड (SCLR) या रस्त्यांच्या सुधारणांबाबत पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. (mumbai suburban guardian minister aaditya thackeray holds a meeting on roads and traffic)

यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आर. एल. मोपलवार, एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, सोनिया  सेठी, सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यशस्वी यादव, मुंबई महापालिका रस्ते विभागाचे संजय दराडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, शहरातील ७ प्रमुख महामार्ग, त्यावरील फ्लाय ओव्हर यांची हाताळणी वेगवेगळ्या विभागांकडून होते. मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हे मार्ग आहेत. शहरातील वाहतूक ही कोंडीविरहित तसंच सुरक्षित होण्यासाठी संबंधित एमएमआरडीए, एमएसआरडीसी, महापालिका, वाहतूक पोलीस आदी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावं. रस्त्यांच्या सुधारणा तसंच त्यांचं सौंदर्यीकरण करण्यात यावे, असं त्यांनी सांगितलं.

मान्सून तसंच कोरोना संकटकाळामुळे थांबलेली रस्त्यांची कामे लवकरच सुरु करण्यात येतील, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी रस्त्यांच्या मान्सूनोत्तर केल्या जाणाऱ्या कामांबाबत सादरीकरण करण्यात आलं. यामध्ये फूटपाथ सुशोभीकरण, बांबूसह इतर शोभेच्या झाडांचं रोपण, रोड मार्किंग, ट्राफिक सायनेजेस, कॅरेजवेंचे अद्ययावतीकरण, ई-टॉयलेट्स, उड्डाणपुलांखालील भागाचे सुशोभीकरण आणि विकास आदींबाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. तसंच शहरातील वाहतूक नियंत्रणासाठी प्रस्तावित असलेल्या इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमचं सादरीकरण करण्यात आलं.

दरम्यान, वरळी येथील रस्त्यांची कामे आणि तेथील वाहतूक व्यवस्थेबाबतही आदित्य ठाकरे यांनी चर्चा केली. वाहतूक विभागाचे पोलीस सहआयुक्त यशस्वी यादव यांच्यासह महापालिका अधिकारी यावेळी उपस्थित होते.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा