Advertisement

मुंबईकरांनो गुलाबी थंडी अनुभवा, 3 दिवसांत किमान तापमान घटणार


मुंबईकरांनो गुलाबी थंडी अनुभवा, 3 दिवसांत किमान तापमान घटणार
SHARES

2017 या वर्षी मुंबईकरांना उन्हाचे चटके जास्तच सहन करावे लागले. याचसोबत दिवाळीआधी पाऊस आणि सोबतच घामाच्या धारा अशी काहीशी अवस्था मुंबईकरांची होती. पण, आता पुढच्या तीन दिवसांत मुंबईकरांना गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहे. कारण येत्या दिवसांत मुंबईचं तापमान 3 अंश सेल्सिअस कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

गेले दोन दिवस म्हणजेच रविवार आणि सोमवारी मुंबईच्या किमान तापमानात घट झाल्याचे आढळून आले. त्यामुळे या दोन दिवशी मुंबईकरांनी चांगली थंडी अनुभवली. सकाळी शाळेत जाणारी मुलं स्वेटर घातलेली दिसली.


स्वेटर, उबदार कपडे बाहेक काढा

मुंबईचे किमान तापमान 24 ते 26 अंशाहून थेट 21 अंशावर घसरले आहे. सोमवारी, तर मुंबईचे किमान तापमान 19.3 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे मुंबईच्या हवेत गारवा निर्माण झाला आहे. शिवाय, किमान तापमानात आता आणखी घट होणार आहे. त्यामुळे, मुंबईकरांना स्वेटर आणि उबदार कपडे बाहेर काढण्याची गरज पडणार आहे.


ऑक्टोबरमध्ये होता हिटचा तडाखा

ऑक्टोबरमध्ये मुंबईकरांनी अक्षरश: घामाच्या धारा काढल्या. त्यावेळेस मुंबईचं कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस होतं. त्यानंतर आता नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुंबईचे किमान तापमान 28 अंशाच्या आसपास नोंदवण्यात आलं होतं.

कोरडे झालेले हवामान आणि उत्तरेकडून सुरू झालेले वारे यामुळे तापमानात घट होऊ लागली आहे. किमान तापमानाबरोबर कमाल तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.


राज्यातही थंडीची चाहूल

गेल्या 24 तासांमध्ये विदर्भासह राज्यातील अनेक भागांत तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये घट झाली आहे. नाशिकमध्ये किमान 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा