Advertisement

मुंबईला दोन वर्षात खड्डेमुक्त करणार : एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा आढावा घेतला

मुंबईला दोन वर्षात खड्डेमुक्त करणार : एकनाथ शिंदे
SHARES

मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shindeयांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबईला येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त करणार असल्याची घोषणा शिंदेंनी केलीय.

मुंबईतील सर्व रस्ते येत्या दोन वर्षात सिमेंटचे करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या खड्ड्यांमुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. केवळ मुंबईच नव्हे तर मुंबईच्या आजूबाजूच्या भागात रस्त्यातल्या खड्ड्यांची स्थिती बिकट आहे. 

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला वेग देण्यात आला असून येत्या दोन वर्षात सर्व कामे पूर्ण होऊन मुंबई खड्डे मुक्त होईल, असा विश्वास महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने डॉ. इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मुंबई महानगरातील रस्ते सुधारणा उपाययोजनांबाबत महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी बैठकीत सादरीकरण केले. 

यापुढे रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करताना ठराविक अंतरावर पाण्याचा निचरा करणारे शोषखड्डे देखील तयार केले जाणार आहेत, जेणेकरून पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवणार नाही.

सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांच्या नवीन निविदांमध्ये त्यादृष्टीने अटींचा समावेश देखील करण्यात आला आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

यंदा 236.58 किमी लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण काम होत आहे. त्यासाठी दोन हजार 200 कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तर आणखी तब्बल 400 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम याच वर्षी प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर उर्वरित 423.51 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण देखील पुढच्याच वर्षी हाती घेण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे. म्हणजेच पुढील दोन वर्षात मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त होतील, याचा महानगरपालिका प्रशासनाला विश्वास आहे, असे आयुक्तांनी बैठकीत नमूद केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा