Advertisement

थंडी गायब; मुंबईकर झाले हैराण


थंडी गायब; मुंबईकर झाले हैराण
SHARES

मुंबईसह राज्यभरातील थंडी सध्या गायब झाली आहे. नोव्हेंबर महिना थंडीचा असला तरी या दिवसात मुंबईकरांना उकड्याच्या त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. यंदा लांबलेल्या पावसाळ्यामुळं ऑक्टोबर महिन्यात 'ऑक्टोबर हीट' फारशी अनुभवावी लागली नव्हती, उलट थंडीची सुखद चाहूल लागली होती. मुंबईत पुढील २ आठवडे तरी तापमान घटण्याची चिन्हे नाहीत.

मुंबईमध्ये गुरुवारी कुलाबा इथं ३२.४, तर सांताक्रूझ इथं ३३.३ कमाल तापमान होते. किमान तापमान दोन्ही केंद्रांवर २५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. गुरुवारी कमाल तापमानात थोडी घट जाणवली. मात्र दिवाळीच्या आधी २० अंशांच्या खाली उतरलेल्या पाऱ्यानं गारठ्याची चाहूल दिली असताना दुपारी असह्य उकाडा होतो आहे.

मुंबईसोबतच कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी तापमापकाचा पारा चढा आहे. गुरुवारी रत्नागिरी इथं कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. या व्यतिरिक्त सोलापूर, परभणी, सांगली, कोल्हापूर, सातारा, जालना, जळगाव, पुणे इथंही कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या दरम्यान आहे. विदर्भातही अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीहून अधिक आहे.

यवतमाळ इथं सरासरीपेक्षा तब्बल ५.९ अंशांनी कमाल तापमानाचा पारा चढलेला आहे. अमरावती इथंही कमाल तापमान सरासरीहून ४.९ अंशांनी अधिक आहे. येत्या २ आठवड्यांमध्ये राज्याच्या अंतर्भागामधील कमाल तापमानात किचिंत घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. तापमान ३० अंशांपर्यंत खाली उतरेल. किमान तापमानही राज्याच्या अंतर्भागात १२ ते १८ अंशांदरम्यान असेल. मात्र मुंबईमध्ये हा दिलासा येत्या २ आठवड्यात मिळण्याची फारशी शक्यता नाही.

मुंबईत किमान तापमान २० अंशांपर्यंत खाली येईल. मात्र फारसा गारठा आणि थंडी अपेक्षित नाही, असंही हवामान विभागाकडुन स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा