Advertisement

अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाई, नवी मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा

अनधिकृत बांधकामांकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट करीत आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला अनधिकृत बांधकामांवरील कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले.

अतिक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाई, नवी मुंबई पालिका आयुक्तांचा इशारा
SHARES

अतिक्रमणं तसंच अनधिकृत बांधकामांमुळे शहराच्या नियोजनाला बाधा पोहचत असून अशा इमारतींमध्ये आयुष्याची कमाई गुंतविणाऱ्या नागरिकांचीही फसवणूक होऊन मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी होते. त्यामुळे माफीया वृत्तीने अनधिकृत बांधकामे (encroachment) करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करण्याचे निर्देश नवी मुंबई महापालिका (Navi Mumbai Municipal corporation) आयुक्त अभिजीत बांगर यांनी अतिक्रमण विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले. अशा बांधकामांकडे कोणी हेतूपुरस्सर दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असल्याचं निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची हयगय न करता कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी आयुक्तांनी दिला. 

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त अमरिश पटनिगिरे तसंच सर्व विभागांचे अतिक्रमण विभागाचे अभियंते आणि वेबसंवादाव्दारे सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी उपस्थित होते.

व्यवस्थेला गृहित धरून होत असलेल्या अनधिकृत बांधकामांकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष खपवून घेतले जाणार नाही असे स्पष्ट करीत आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला अनधिकृत बांधकामांवरील कारवाई तीव्र करण्याचे निर्देश दिले. यावेळी जानेवारीपासून जूनपर्यंतच्या अतिक्रमण विरोधी कारवाईचा आढावा घेताना आयुक्तांनी सध्या सुरु असलेल्या सर्व बांधकामांना बजाविलेल्या नोटिसांचा विभागनिहाय आढावा घेतला. 

यामध्ये विभाग कार्यालयांमार्फत नोटिसा दिलेल्या व कारवाई केलेल्या अनधिकृत बांधकामांच्या संख्येबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आयुक्तांनी त्याबाबत फेरतपासणी करण्याचे व त्याकडे नियमित लक्ष देण्याचे निर्देश विभाग अधिका-यांना दिले. एकदा नोटीस दिलेले अथवा कारवाई केलेले बांधकाम पुन्हा सुरू होणार नाही याकडेही बारकाईने लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देश दिले. 

अनधिकृत बांधकामावर महापालिकेमार्फत लावण्यात येणारे जनजागृतीपर फलक नागरिकांच्या नजरेस पडतील अशा रितीने प्रदर्शित केले जातील व काढून टाकले जाणार नाहीत याकडेही काटेकोर लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले. तसेच सिडको व एमआयडीसीच्या जागांवरही अनधिकृत बांधकाम होत असेल तर त्याबाबतही दक्ष राहण्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

अतिक्रमण प्रतिबंधासाठी प्रत्येक विभाग कार्यालयात स्वतंत्र कनिष्ठ अभियंता असून या अभियंत्यानी कायम दक्ष राहून काम करावे तसेच अर्धा दिवस कार्यक्षेत्रात फिरती करून मगच कार्यालयीन कामकाजाकरिता कार्यालयात यावे असेही स्पष्ट निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम याबाबत माहिती देण्याची जबाबदारी विभाग कार्यालयातील अतिक्रमण प्रतिबंधासाठी नियुक्त कनिष्ठ अभियंता यांची असून त्यापुढील कार्यवाहीची जबाबदारी विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांची असल्याचे स्पष्ट करीत आयुक्तांनी कोणी तक्रार आल्यानंतर कारवाई केलीच पाहिजे. मात्र तक्रार येण्याची वाट न बघता विभागात अनधिकृत बांधकामे होणार नाहीत याची स्वत:हून काळजी घेतली पाहिजे असे स्पष्ट करीत अतिक्रमणावरील कारवाईबाबत निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही अशा कडक सूचना दिल्या.

 


हेही वाचा -

Corona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण

  1. वन रुपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा