Advertisement

दादर स्थानकापर्यंत पोहोचली बस… पण अपघाताची भीती


दादर स्थानकापर्यंत पोहोचली बस… पण अपघाताची भीती
SHARES

दादर रेल्वे स्थानक हा तसा गजबजलेला परिसर. रेल्वे प्रवाशांची वर्दळ आणि फेरीवाल्यांनी अडवलेले रस्ते, पदपथ… त्यामुळे गर्दीतून रस्ता काढत कसाबसा प्रवास करणाऱ्या दादरकरांना गेल्या आठ दिवसांपासून फेरीवालामुक्त परिसराचा अनुभव घेता येत आहे. मात्र, मंगळवारी त्यात आणखी एक सुखद धक्का दादरकरांना बसला. तो म्हणजे या मार्गावरून धावणारी बेस्ट बस. दादर रेल्वे स्थानकाच्या जावळे मार्गावरून वरळी आगार आणि नेहरू सेंटरसाठी दोन बसेस सुरू करण्यात आल्या आहे. परंतु, फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे हा परिसर फेरीवालामुक्त दिसत असला तरी याठिकाणी बसेस वळवण्यासाठीच जागा पुरेशी नसल्यामुळे दुघर्टनेला आमंत्रण देण्यासारखे असल्याची भीती वर्तवली जात आहे.


फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाईचा मनसेचा इशारा

दादर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडे असलेल्या केशवसूत उड्डाणपुलाखाली सर्व गाळे तोडून येथील सर्व फेरीवाल्यांना हटवण्याची मोहीम महापालिकेने तीन वर्षांपूर्वी हाती घेतली होती. त्यावेळी रेल्वे स्थानकापर्यंत टॅक्सी तसेच अन्य खासगी वाहनांची वाहतूक होईल, अशाप्रकारचा आराखडा तत्कालिन जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांनी वाहतूक पोलिसांच्या मदतीने बनवला होता. परंतु, पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी ठाण मांडत तोडलेल्या पुलाखालील गाळ्यातही अतिक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे प्रत्यक्षात साकारला न गेलेला आराखडा आता किमान मनसेने फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाईचा इशारा दिल्यानंतर साकारला जात आहे.


...हा तर सुखद धक्का

मागील पंधरा दिवसांपासून दादरमधील फेरीवाल्यांविरोधात रेल्वे पोलीस, मुंबई पोलीस आणि महापालिकेच्यावतीने कडक कारवाई केली जात आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या फेरीवालामुक्त दादरमध्ये चक्क स्थानकापर्यंत धावत असलेली बस पाहताना सर्वांना सुखद धक्का बसत आहे. दादर रेल्वे स्थानकाजवळील जावळे मार्गावरून बस क्रमांक ५६ (वरळी आगार) आणि बस क्रमांक १५१ (वरळी नेहरू तारांगण) या दोन बसेस मंगळवारी सुरू करण्यात आल्या. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, स्थानिक नगरसेविका प्रिती प्रकाश पाटणकर आदी उपस्थित होते.


केशवसूत उड्डाणपूलाजवळून वळवली बस

जावळे मार्गावरून ही बस सुरू केली असली तरी या बसला वळवण्यासाठी पुरेशी जागाच नाही. केशवसूत उड्डाणपूलाजवळून ही बस वळवली जात आहे. परंतु गर्दीतून ही बस वळवताना बस चालकाला फारच कसरत करावी लागत असून बस मागे घेताना चक्क तिन्ही बाजूला एकेक तिकीट तपासणीस यांना तैनात करूनच ही बस वळवावी लागत आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस या ठिकाणी बस वळवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे असल्याची भीती खुद्द बस चालकांकडून वर्तवली जात आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा