
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. आता माहिती समोक येत आहे की, ठाण्यातील दाटीवली येथे होणाऱ्या बुलेट ट्रेन स्थानकाभोवती 1,300 एकरांहून अधिक भागात बिझनेस हब (Central Business District) उभारण्याची तयारी सुरू आहे.
“केंद्र सरकार ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवतीच्या परिसरासाठी स्थानिक क्षेत्र विकास आराखडा (Local Area Plan) तयार करत आहे,” असे ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले.
“आम्ही आखत असलेला हा नवीन व्यावसायिक विभाग बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पेक्षाही अधिक प्रगत असेल,” असे ते म्हणाले.
मंगळवारी ठाणे महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, 1966 अंतर्गत ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवती विकासासाठी पहिली अधिसूचना जारी केली. या 1,300 एकर क्षेत्रासाठीचा स्थानिक विकास आराखडा ठाणे महानगरपालिका तयार करणार आहे. त्यासाठी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) मार्गदर्शन करणार आहे, असे अधिसुचनेत नमूद केले आहे.
यानुसार, आराखड्यात ठाणे महापालिका हद्दीतील दाटीवली, म्हातरडी, बेटवडे आणि आगासन या गावांचा काही भाग समाविष्ट आहे. तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) हद्दीतील ऐरे, कोपर, भोपर, नांदिवली टर्फ पंचानंद, कटाई आणि उसरघर या गावांचा काही भाग समाविष्ट असेल.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त आणि प्रशासकांनी 7 नोव्हेंबर 2024 रोजी ठाणे महापालिकेला पत्राद्वारे या क्षेत्राच्या एकत्रित विकास आराखड्याला संमती दिल्याचे नमूद केले आहे. याच वर्षी 7 जानेवारी रोजी राज्याच्या नगरविकास विभागाने स्थानिक विकास आराखडा तयार करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेला दिली होती, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.
बुलेट ट्रेन मार्गाची सुरुवात BKC पासून होईल आणि तो ठाणे, भिवंडी, पालघर आणि दहाणू मार्गे महाराष्ट्रातून जात गुजरातमध्ये प्रवेश करेल.
“महाराष्ट्रातील चार बुलेट ट्रेन स्थानकांभोवतीचा बहुतांश भाग अद्याप विकसित नाही. बुलेट ट्रेनमुळे थेट BKC जोडली जाणार आहे. नगरविकास विभागाला वाटते की, या परिसरात नवीन टाउनशिप उभारता येईल,” असे या आराखड्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने हिंदुस्तान टाइम्सला सांगितले.
हेही वाचा
