Advertisement

मालमत्ता कर वसुलीसाठी पालिका पिटणार दवंडी

मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आता नवीन शक्कल लढवली आहे. पालिका ध्वनिक्षेपकावरून मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती करणार आहे.

मालमत्ता कर वसुलीसाठी पालिका पिटणार दवंडी
SHARES

मुंबई महापालिकेचा (Mumbai Municipal Corporation) मालमत्ता कर (Property tax) हा महसुलाचा महत्त्वाचा स्रोत आहे. यंदा मात्र मालमत्ता कराची वसुली चांगलीच घटली आहे. त्यामुळे मालमत्ता कर वसूल करण्यासाठी आता नवीन शक्कल लढवली आहे. पालिका ध्वनिक्षेपकावरून मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती करणार आहे. रस्त्यांवरून दवंडी पिटल्याप्रमाणे ध्वनिक्षेपकावरून प्रत्येक ठिकाणी जाऊन मालमत्ता कर भरण्याचं आवाहन करण्यात येणार आहे. 

यंदा पालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) करनिर्धारण विभागाची वसुली घटली आहे. आर्थिक वर्ष संपत आले तरी केवळ ३ हजार कोटी रुपयांची वसुली झाली आहे. अनेक कंपन्यांनी मालमत्ता कर (Property tax) थकवले असून त्याच्या थकबाकीची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यामुळे पालिकेने मालमत्तांना नोटिसा धाडणे, जप्ती, पाणी तोडणे अशा कारवाया सुरू केल्या आहेत. या वर्षी मालमत्ता करवसुलीसाठी ५१०० कोटी रुपयांचं लक्ष्य ठेवलं होतं. त्यापैकी केवळ ३ हजार कोटी रुपयांचीच वसुली झाली आहे. करनिर्धारण विभागाला महिन्याभरात २ हजार कोटींची तूट भरून काढावी लागणार आहे.

मालमत्ता करमाफीच्या घोळामुळे निवासी सदनिकांची अडकलेली देयकेही धाडली आहेत. आता करनिर्धारण विभागाने रस्त्यावर फिरत ध्वनिक्षेपकावरून मालमत्ता कर (Property tax ) भरण्यासंदर्भात आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या एच पूर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी बांद्रा, खार परिसरात मालमत्ता कर भरण्याबाबत जनजागृती केली. मालमत्ता कर वेळेत भरला नाही तर मालमत्ता जप्त करणे, मालमत्तेची विक्री करणे किंवा पाणीपुरवठा खंडित करणे अशी कारवाई केली जाईल, असे आवाहन ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत होते. विशेषत: व्यापारी स्वरूपाच्या मालमत्तांच्या जवळ जाऊन वाजतगाजत, ध्वनिक्षेपकावरून याबाबत आवाहन करण्यात आले. पालिकेने मोठ्या १०० थकबाकीदारांची यादी जाहीर केली आहे. मोठ्या १० थकबाकीदारांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरू केली आहे.


हेही वाचा -

कुख्यात गुंडाला या पोलिस अधिकाऱ्याने दिलं अभय

मेट्रो-३ बाधितांचं होणार पुनर्वसन
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा