टँकरमाफियांना चाप लावणारं नवीन धोरण

  BMC
  टँकरमाफियांना चाप लावणारं नवीन धोरण
  मुंबई  -  

  मुंबई - पाण्याचा पुरवठा करणाऱ्या वॉटर टँकर माफियांच्या नाड्या महापालिका प्रशासनाने आवळल्या असून यापुढे पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरवाल्यांना पिण्याव्यतिरिक्त पाण्याचा पुरवठा टँकरमधून करता येणार नाही. तर इतर पाण्याचा पुरवठा करणाऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करता येणार नाही. एवढेच नव्हेतर टँकर मालकांना यापूर्वी देण्यात येणाऱ्या आरोग्य विभागाच्या परवान्याच्या तुलनेत यापुढे प्रत्येक टँकरसाठी स्वंतत्र परवाना घेणे टँकर मालकांना बंधनकारक राहणार आहे.

  मुंबईत पिण्यासाठी वापरायचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करण्याच्या अनुषंगाने महापालिकेने ‘सर्वसमावेशक वॉटर टँकर धोरण मसूदा’ तयार करण्यात आला असून हे धोरण महापालिकेच्या संकेत स्थळावर नागरिकांच्या हरकती आणि सूचनांसाठी टाकण्यात आले आहे. टँकरने पाण्याचा पुरवठा करणाऱ्यांना महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचा परवाना घेणे बंधनकारक असते. असा परवाना यापूर्वी संबंधित टँकर पुरवठादाराच्या नावाने दिला जात असे. ज्यामुळे एकाच पुरवठादाराकडे अनेक टँकर असल्यास त्यासाठी एकच परवाना पुरेसा होता. परंतु आता नव्या धोरणामध्ये प्रत्येक वॉटर टँकरसाठी त्यांच्या वाहनाच्या नोंदणी क्रमांकानुसार स्वतंत्र परवाना देण्यात येणार आहे.

  महापालिकेचे पिण्याचे पाणी भरण्यासाठी सध्या 18 ठिकाणी ‘टँकर फिलिंग पॉइंट’ आहेत. तसेच आता लवकरच या ‘टँकर फिलिंग पॉइंट’ची संख्या वाढवून 50 पर्यंत वाढवण्यात येणार आहे. सध्या असलेल्या 18 ठिकाणी रात्रीच्यावेळीही छायाचित्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

  अर्जाशिवाय टँकरने पाणीपुरवठा नाही

  मुंबईतील झोपडपट्टी भाग तसेच अन्य व्यक्ती अथवा संस्थांना यापूर्वी तोंडी मागणीनुसारही पाण्याचा पुरवठा केला जात असे. परंतु नव्या धोरणात महापालिकेकडून टँकरद्वारे पाणी हवे असल्यास संबंधितांना विभाग कार्यालयातील सहाय्यक अभियंता जलकामे यांना अर्ज करणे बंधनकारक आहे आणि अधिकृत जलजोडणी असलेल्या ग्राहकालाच हा अर्ज करता येणार आहे. यासाठी शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, पाणीकपातीच्या काळात किंबहुना पाणीपुरवठा होत नसल्यास पाण्याचा पुरवठा मोफत केला जाईल, असेही नमुद करण्यात आला आहे. संबंधित पुरवठादाराचे किमान एक कार्यालय हे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात असणे प्रस्तावित धोरणानुसार बंधनकारक असणार आहे. प्रत्येक टँकर धारकाने कुठून पाणी घेतले आणि पाणीपुरवठा कोणत्या ठिकाणी केला याचा तारीख, वार आणि वेळा यानुसार असणारा तपशील असणारे रजिस्टर ठेवणे आता बंधनकारक असणार आहे. याबाबतची तपासणी महापालिकेद्वारे अचानकपणे केली जाणार आहे. मसुद्याबाबत नागरिकांनी त्यांच्या सूचना अथवा प्रतिक्रिया येत्या 15 एप्रिल 2017 पर्यंत सायंकाळी 4 वाजेपर्यंत महापालिकेच्या जल अभियंता यांच्याकडे पोहोचतील अशा पद्धतीने पाठवाव्यात असे आवाहन उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) रमेश बांबळे यांनी दिली आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.