Advertisement

म्हाडाचं नवंकोरं घर की कचराकुंडी? मालवणीतील घरांची दुरवस्था

मालवणीतील नवाकोऱ्या घराची चावी ज्यांना मिळाली, त्या घराची आणि इमारतीची अवस्था कचराकुंडीपेक्षा वेगळी नव्हती. हे पाहून विजेत्यांना चांगलाच धक्का बसला.

म्हाडाचं नवंकोरं घर की कचराकुंडी? मालवणीतील घरांची दुरवस्था
SHARES

कांदिवलीतील अमोल खराडे यांना २०१५ मध्ये म्हाडाच्या मालवणीतील घराची लाॅटरी लागली. मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, यामुळे संपूर्ण खराडे कुटुंब आनंदात होतं. नोव्हेंबर २०१६ मध्ये खराडे यांनी घराची संपूर्ण रक्कम भरली. आता त्यांना प्रतिक्षा लागली होती ती हातात घराची चावी पडण्याची. एक-एक महिने पुढे सरकू लागले; पण या घरांना ओसी नसल्याने चावीचा पत्ता नव्हता. अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर घराची चावीही खराडे कुटुंबीयांच्या हातात पडली. त्यामुळे खराडे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण ज्या नव्याकोऱ्या घराची चावी त्यांना मिळाली, त्या घराची आणि इमारतीची अवस्था कचराकुंडीपेक्षा वेगळी नव्हती. हे पाहून खराडेंना चांगलाच धक्का बसला.


गर्दुल्ल्यांचा अड्डा

संपूर्ण इमारतीला कचऱ्याचा वेढा, दुर्गंधी, वीज, पाण्याच्या पत्ता नाही, नळाला तोटी नाही, भिंतींचा रंग उडालेला, उखडलेल्या फरशा, प्लास्टर उखडलेले. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे मालवणीतील २०१५ च्या लाॅटरीतील दोन्ही इमारती गर्दुल्ल्यांचा अड्डा बनल्याचं त्यांना दिसून आलं. इमारतीची दुरवस्था पाहून खराडे आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब नाराज झालं आहे. खराडेसारखीच अवस्था मालवणीतील प्रत्येक विजेत्याची आहे.



या घरांत कसं राहायचं?

म्हाडाच्या बांधकामाच्या दर्जाकडे नेहमीच बोट दाखवलं जाते. असं असतानाही अधिकारी बिल्डरकडून वेळेत काम पूर्ण करून घेत नाहीतच; पण इमारतीची देखभालही करत नसल्याचं यातून समोर आलं आहे. अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे म्हाडाच्या इमारती गर्दुल्ल्यांचा अड्डा बनल्या आहेत. त्यामुळे अशा घरांमध्ये आम्ही रहायला जायचं कसं? असा सवाल खराडे यांच्यासह अन्य विजेत्यांकडून विचारला जात आहे. तर म्हाडाने या घरांची त्वरीत डागडुजी करत घरे राहण्याजोगी करावी, अशी मागणी या विजेत्यांनी उचलून धरली आहे.


ओसी नसतानाच हप्ते वसूल

म्हाडाने मालवणीतील २ इमारतीतील २२४ घरांसाठी २०१५ मध्ये लाॅटरी काढली होती. या दोन्ही इमारती बांधून तयार होत्या. पण ओसी नसल्याने विजेत्यांना घरांचा ताबा देता येत नव्हता. ओसी मिळाल्याशिवाय घराची रक्कम म्हाडाला वसूल करता येत नसताना मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी विजेत्यांकडून घराची रक्कम वसूल करण्याचा पराक्रम केला. अधिकाऱ्यांच्या या पराक्रमाचा पर्दाफाश 'मुंबई लाइव्ह'ने तीन महिन्यांपूर्वी केला होता.

एकीकडे अधिकारी ओसी घेण्यासाठी महापालिकेत ठाण मांडून बसले, तर दुसरीकडे ज्या अधिकाऱ्यांनी हा पराक्रम केला त्यांना मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी धारेवर धरत 'कारणे दाखवा' नोटीसा पाठवल्या. तीन महिन्यानंतर अखेर अधिकाऱ्यांनी २२४ घरांसाठी ओसी मिळवली खरी. पण आता या अधिकाऱ्यांचा आणखी एक पराक्रम उघड झाला आहे तो घरांच्या दुरावस्थेच्या माध्यमातून.



हेही वाचा -

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करण्यास २ दिवस मुदतवाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा