Advertisement

मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : अखेर मालवणीतील ‘त्या’ घरांना ओसी


मुंबई लाइव्ह इम्पॅक्ट : अखेर मालवणीतील ‘त्या’ घरांना ओसी
SHARES

म्हाडाच्या मालवणीतील 232 घरांना ओसी नसतानाही नियम धाब्यावर बसवून विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेण्याचा पराक्रम म्हाडाच्या मुंबई मंडळातील पणन विभागाने गेल्या वर्षी केला होता. पणन विभागाच्या या पराक्रमाचा पर्दाफाश नुकताच 'मुंबई लाइव्ह'ने केला होता. त्यानंतर खडबडून जागे झालेले मंडळाचे अधिकारी गेल्या महिन्याभरापासून ओसीसाठी मुंबई महानगर पालिकेत ठाण मांडून होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 232 पैकी 168 घरांना ओसी मिळाली असून आता विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया बुधवारपासून सुरू करण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.


काय आहे प्रकरण?

म्हाडाच्या 2015 च्या सोडतीत मालवणीतील 232 घरांचा समावेश होता. ही घरे अत्यल्प गटासाठी होती. या घरांची सोडत काढल्यानंतर मुंबई मंडळाने विजेत्यांची पात्रता निश्चिती करत पात्र विजेत्यांना गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान देकार पत्र पाठवत घराची रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या. हक्काच्या घराचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात उतरणार असल्याने देकार पत्र हातात पडल्याबरोबर खुश झालेल्या अंदाजे 224 विजेत्यांनी मुंबई मंडळाकडे घराची रक्कम भरली. कुणी 100 टक्के तर कुणी 25 टक्के रक्कम भरली. 100 टक्के रक्कम भरल्याने घराचा ताबा घेण्यासाठी मुंबई मंडळाकडे गेलेल्या विजेत्यांना मंडळाने मोठा धक्काच दिला.

घरांना ओसी नसल्याने 'ओसी मिळाल्यानंतरच घराचा ताबा देऊ' असे मंडळाकडून कळवण्यात आले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. कारण 100 टक्के रक्कम भरलेल्या विजेत्यांच्या गृहकर्जाचा हप्ता सुरू झाला होता. हप्त्यावर हप्ते कापून जाऊ लागले, तरी घराचा ताबा मिळत नसल्याने गेल्या महिन्यात काही विजेत्यांनी थेट मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरच हल्लाबोल करत 'ताबा द्या वा घराचा हप्ता भरा' अशी मागणी केली.


नियम धाब्यावर

गेल्या काही वर्षांपासून मुंबई मंडळाकडे तयार घरे नसल्याने चालू बांधकामातील घरे सोडतीत समाविष्ट केली जात आहेत. पण याचा फटका म्हाडासह विजेत्यांना बसत होता. कारण ओसी नसताना घरांची रक्कम वसूल केल्याने विजेत्यांवर नाहक कर्जाच्या हप्त्याचा बोजा पडत होता, तर म्हाडालाही टीकेला सामोरे जावे लागत होतो. त्यामुळे 2012-13 मध्ये तत्कालीन म्हाडा उपाध्यक्षांनी ओसी मिळाल्यानंतरच विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेण्याचा निर्णय घेत तशी तरतूदही नियमांमध्ये केली. त्यामुळे ओसी मिळाल्यानंतरच घराची रक्कम वसूल करणे बंधनकारक आहे.

असे असताना मुंबई मंडळाच्या पणन विभागाने हा नियम धाब्यावर ठेवत मालवणीतील 232 घरांना ओसी नसताना 224 विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेतली. विजेत्यांचे कर्जाचे हप्ते सुरू झाले, पण घराचा ताबा मिळाला नाही. दरम्यान, यासंबंधीचे सविस्तर वृत्त महिन्याभरापूर्वी 'मुंबई लाइव्ह'ने प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर म्हाडात प्रचंड खळबळ उडाली. या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणीही झाली. मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी 'मुंबई लाइव्ह'च्या वृत्ताची दखल घेत संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. तर शक्य तितक्या लवकर ओसी मिळवून देण्याचे आदेशही दिले होते.

उशीरा का होईना पण म्हाडाला जाग आली आणि ओसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात म्हाडाला यश आले आहे. पण आमचे या गेल्या काही महिन्यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ते कोण भरून देणार? हा प्रश्नच आहे. त्यामुळे यासंबंधी म्हाडाने योग्य तो विचार करावा.

अक्षय कुडकेलवार, विजेते, मालवणी

'मुंबई लाइव्ह'च्या वृत्तानंतर महिन्याभरापासून संबंधित अधिकारी अक्षरश: पालिकेत ठाण मांडून ओसीची प्रक्रिया पार पाडताना दिसत होते. अखेर 1 सप्टेंबरला ओसीची प्रक्रिया पूर्ण झाली असून बुधवारी 6 सप्टेंबरला म्हाडाच्या हातात ओसी पडली आहे. 232 पैकी 168 घरांना ओसी मिळाली असून उर्वरित घरांच्या ओसीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली आहे.


घरांचा ताबा देण्यास सुरूवात

बुधवारी सकाळी ओसी हातात पडल्याबरोबर पणन मंडळाने घराच्या वितरणाची प्रक्रिया हाती घेतली आहे. 168 पैकी 110 विजेत्यांना बुधवारीच मुद्रांक शुल्क आणि इतर शुल्क भरण्यासंबंधीची पत्रे पाठवण्याच्या कामाला सुरूवात झाल्याची माहिती मुंबई मंडळाकडून देण्यात आली आहे. आता हे शुल्क भरले की त्वरीत या विजेत्यांना घराचा ताबा देण्यात येणार आहे.



हेही वाचा

धक्कादायक! ओसी नसतानाही म्हाडाने भरून घेतली घराची रक्कम!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा