Advertisement

केंद्र सरकारच्या अनुदानाअभावी रखडलं निर्भया सेंटर


केंद्र सरकारच्या अनुदानाअभावी रखडलं निर्भया सेंटर
SHARES

मुंबईतील पीडित महिलांना तातडीने वैद्यकीय आणि अन्य मदत मिळावी म्हणून महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये निर्भया सेंटरची निर्मिती करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे सध्या यासाठीची प्रक्रिया महापालिका रुग्णालयांमध्ये सुरू आहे. पण प्रत्यक्षात यासाठीची मंजुरी आणि केंद्र सरकारकडून मिळणारं अनुदान न मिळाल्याने हे काम थांबलं आहे. त्यामुळे यासाठीची मान्यता आणि केंद्राकडून अनुदान प्राप्त झाल्यानंतर निर्भया सेंटर त्वरीत सुरू करण्यात येईल, असं महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.

निर्भया सेंटर सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कार्यान्वित आहे. याप्रस्तावांतर्गत प्रयोगशाळा आणि उपचारासाठी कक्ष स्वतंत्र तयार करण्याचं कामही सुरू आहे. जेणेकरून अशा रुग्णांना एकाच ठिकाणी उपचार आणि पाठपुरावा करणे शक्य होईल, असं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.


पीडित महिलांच्या मदतीसाठी...

दिल्ली येथे निर्भया नावाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडल्यावर केंद्र सरकारने निर्भया निधीची स्थापना करून अशाप्रकारे दुर्देवी घटनेत बळी पडलेल्या महिलांना मदत करण्यासाठी आवश्यक असणारे निर्भया सेंटर सुरू करण्याची योजना आणली आहे.


केईएममध्ये निर्भया सेंटरची मागणी

मुंबईमधील मालाड पूर्व येथे अल्पवयीन गतिमंद मुलीचं अपहरण केल्याची घटना नुकतीच घडली. त्यामुळे मुंबईतील पीडित महिलांना तातडीने वैद्यकीय आणि अन्य सर्व मदत मिळावी म्हणून आवश्यक असणारे निर्भया सेंटर महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरू करण्याची मागणी भाजपा नगरसेविका प्रियांका मोरे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.


अशा रुग्णांचं पुनर्वसन

केईएम रुग्णालयांत पीडित रुग्णांसाठी वन स्टॉप क्लायसिस केंद्र कार्यान्वित आहे. या केंद्रात रुग्णाला भरती करून स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्र, शल्यचिकित्साशास्त्र आणि बालरोग शल्यचिकित्साशास्त्र विभागातील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने एकत्रित प्रथमोपचार केले जातात. तसेच रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक यांचं मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन केलं जातं. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता विभागाकडून अशा रुग्णांचं आवश्यक आणि गरज भासल्यास पुनर्वसन करण्यात येत असल्याचं आरोग्य विभागानं म्हटलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा