‘अजिनोमोटो’च्या बंदीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

  Mumbai
  ‘अजिनोमोटो’च्या बंदीकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
  मुंबई  -  

  मुंबईमध्ये सध्या चायनीज खाद्यपदार्थाच्या खवय्यांची संख्या वाढत असताना, ते पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘अजिनोमोटो’ अर्थात मानोसोडीयम ग्लुटोमेडवर बंदी घालण्याबाबत अन्न आणि औषध प्रशासन गंभीर नसल्याची बाब समोर आली आहे. अजिनोमोटोवर बंदी घालण्याबाबत महापालिकेने 18 नोव्हेंबर 2014 मध्ये अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार करूनही अद्याप या विभागाने याबाबत कोणतीही कार्यवाही केली नसल्याची बाब समोर आली आहे.

  मुंबईतील सर्व चायनीज हॉटेल्स आणि हातगाड्यांवर बनवल्या जाणाऱ्या चायनीज खाद्यपदार्थांमध्ये अजिनोमोटो पावडर वापरण्यास तात्काळ बंदी घालण्याचा ठराव महापालिका सभागृहात 20 ऑक्टोबर 2014 मध्ये करण्यात आला होता. तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केलेल्या मागणीनुसार हा ठराव करण्यात आला होता. या ठरावानुसार अन्न आणि औषध प्रशासनाला अजिनोमोटोवर बंदी घालण्याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार कार्यकारी आरोग्य अधिकारी विभागाने केली. परंतु अद्यापही ही कार्यवाही केली गेली नाही. कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशा प्रकारचे पत्र अन्न आणि औषध प्रशासनाला पाठवले होते. परंतु पुढे काय कार्यवाही केली आहे, याचे महापालिकेला काही कळवले नाही. त्यांनी परस्पर कारवाई केली असेल तर आपल्याला कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

  मात्र, मानोसोडीयम ग्लुटोमेड (अजिनोमोटो-एमएसजी) याचा चायनीज पदार्थांमध्ये सर्रास वापर करणाऱ्या चायनीज हातगाड्यांविरोधात विभाग स्तरावर अतिक्रमण निर्मूलन पथकाद्वारे सर्व विभागांमध्ये कारवाई करण्याचे निर्देश मार्च 2015 मध्येच दिले आहेत. चायनीज गाड्यांवरील या कारवाईदरम्यान आरोग्य खात्यात कार्यरत असलेल्या अन्न अवेक्षक (जे ओ फूड) यांची मदत घेण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाकडून आदेश दिले असले तरी रात्रीच्या वेळी चायनीज गाड्या आणि चायनीज भेळचे स्टॉल्स मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत असतात.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.