SHARE

राज्य सरकारने प्रसिध्द केलेल्या विकास आराखड्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच महापालिका सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी महापालिका सभागृहात यावर निवेदन करत महापालिका आयुक्तांचा आणि राज्य शासनाचा तीव्र निषेध केला. 

नियोजन समिती आणि महापालिका सभागृहात नगरसेवकांनी केलेल्या सूचनांच्या शिफारशी रद्द करताना महापालिकेला याची कारणे देण्यात आलेली नाहीत. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून नाराजीचा सूर उमटवला गेला. मात्र, शिवसेना आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळामुळे यावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे शिवसेनेचा हा मुद्दा बासनात गुंडाळला गेला.


३ पानेच मराठीतून

राज्य शासनाने प्रसिध्द केलेल्या आराखड्यात नियोजन समितीने २५०० आणि सभागृहात २६६ अशाप्रकारे २७६६ शिफारशी केल्या. त्यातील अनुक्रमे २००० हजार आणि ६६ शिफारशी बाद केल्याची माहिती त्यांनी विशाखा राऊत यांनी दिली. तसेच या विकास आराखड्यात सुधार समितीला डावलून महापालिका आयुक्तांना अधिकार देण्यात आला. याबरोबरच आराखड्यातील १०७२ पानांपैकी केवळ ३ पानेच मराठीतून असून हा आराखडा त्यांनी इंग्रजीतून केला असल्याचे सांगत प्रशासनाचा त्यांनी तीव्र निषेध केला.


जोरदार घोषणाबाजी

राऊत यांचं भाषण सुरु असतानाच विराधी पक्षनेते रवी राजा यांनी एवढ्या मोठ्या विषयावर चर्चा सुरु असताना आयुक्त कुठे? त्यांना बोलवा अशी मागणी केली. यावर अरविंद भोसले आणि अनिल कोकीळ यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी  मुंबई आमच्या हक्काची… नाही कुणाच्या बापाची, आयुक्तांना बोलवा… मुख्यमंत्र्यांची चाटूगिरी करणाऱ्या आयुक्तांना झोपवा, आयुक्त हाय हाय अशा जोरदार घोषणा केल्या. याला विरोधी पक्षांनीही पाठिंबा दिला. त्यामुळे सभागृहात चर्चा सुरु असताना आयुक्तांना बोलावूनही ते न आल्यामुळे महापौरांनी सभागृहाचे कामकाजच तहकूब करून टाकलं.


आराखड्याबाबत भाजपा गप्प का ?

विकास आराखडयाला अजून दोन महिने शिल्लक आहे. त्यामुळे त्यावर मंगळवारी चर्चा अपेक्षित नव्हती. हा सरकारच्या अखत्यारितील मुद्दा असून शिवसेनेचे कॅबिनेट, राज्यमंत्री तसेच आमदार तिथे होते. मराठीतून विकास आराखडा नव्हता, तर त्यांनी याला विरोध का केला नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. विकास आराखड्यासंदर्भात भाजपा मुग गिळून गप्प का असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राखी जाधव यांनी नगरसेवकांनी ज्या सूचना आराखड्यात केल्या आहेत आणि सरकारने त्या स्वीकारलेल्या नाहीत याची माहिती नगरसेवकांना मिळायला हवी, असं सांगितलं.


सेना, भाजपामुळे मुंबईकरांचे नुकसान

विकास आराखड्यासंदर्भात शिवसेनेने निवेदन करण्याऐवजी सरकारचा निषेध करत सत्तेतून बाहेर पडावं, असे सपाचे गटनेते रईस शेख यांनी म्हटलं आहे. शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये जे राजकीय भांडण आहे, त्यामुळे मुंबईकरांचे नुकसान होत असल्याचा आरोप शेख यांनी केला. तर  विकास आराखड्यातील कोणती आरक्षण आहे, जी वगळली आहेत, त्याची यादी जाहीर करावी. भाजपा त्यावर चर्चा करायला तयार असल्याचे भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी सांगितले.


मराठी अाराखड्याला भाजपाचे समर्थन 

 विकास आराखड्याच्या मुद्दयावरून राज्य सरकारवर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे कोटक यांनी म्हटलं आहे. मोकळ्या जागांच्याबाबत भाजपा कुठलीही तडजोड करणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. विकास आराखडा मराठीतून हवा या मागणीला भाजपाचे पूर्णपणे समर्थन आहे, आणि ज्याने यात कामचुकारपणा केला आहे, त्यावर कारवाई करण्याची आमची मागणी असल्याचंही कोटक यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा - 

तुंबईवरून विरोधकांचा गोंधळ, सभागृहाचे कामकाज तहकूब

बाप्पा पावला! सिद्धिविनायक मंदिरातील कर्मचारी होणार 'परमनंट'संबंधित विषय
ताज्या बातम्या