माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता कर माफ

  BMC
  माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता कर माफ
  मुंबई  -  

  मुंबईत वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांच्या विधवांना आणि शौर्यपदक मिळालेल्या सैनिकांना मालमत्ता करात सवलत देण्यात येणार आहे. शासन पातळीवर शौर्यपदक धारक सैनिक आणि माजी सैनिक यांच्या विधवांना मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर याची कार्यवाही मुंबई महापालिकेच्या वतीने केली जात आहे. शौर्यपदक धारक सैनिक आणि सैनिकांच्या विधवांनी आपल्या मालमत्तांचे पुरावे सादर केल्यास या आथिर्क वर्षापासून मालमत्ता करात १०० टक्के सवलत देण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

  माजी सैनिकांच्या विविध संघटनांनी मालमत्ता करातून सवलत मिळण्याबाबत शासनाकडे विनंती केल्यानंतर ७ एप्रिल २०१६ रोजी नगरविकास खात्याने संरक्षण दलातील शौर्यपदक धारकांना आणि माजी सैनिकांच्या विधवांना त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेच्या मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय पारित केला होता. या शासन निर्णयानंतर याची पुढील कार्यवाही करण्यासाठी महापालिका आणि नगरपरिषद यांना आदेश प्राप्त झाले होते. परंतु महापालिका अधिनियमात तरतूद नसली तरी शासनाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ५२० (क) अन्वये करसवलतीची योजना संरक्षण दलातील जवान आणि त्यांच्या विधवांसाठी आहे. तसेच ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने कर सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत महापालिका सभागृहात ठराव करण्यात आला. संरक्षण दलातील शौर्य पदक धारकांच्या एका मालमत्तेस मालमत्ता कराच्या सर्वसाधारण करात १०० टक्के आणि माजी सैनिकांच्या विधवांना त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांना मालमत्ता करात १०० टक्के सवलत अटी आणि शर्तीसापेक्ष सवलत देण्यात येत असल्याचे करनिर्धारण आणि संकलन विभागाने स्पष्ट केले आहे.

  ही सवलत परस्पर मिळणार नसून यासाठी सैनिकांना महापालिकेकडे अर्ज करावा लागणार आहे. त्यानुसारच या कर सवलतीचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. परंतु जर सैनिकांनी आणि त्यांच्या विधवांनी चुकीचे तसेच खोटे पुरावे सादर केल्याची बाब समोर आल्यास त्यांना दिलेल्या सवलतीचा लाभ रद्द केला जाईल. तसेच मालमत्ता कराची पूर्ण रक्कम वसूल केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. एवढेच नव्हे, तर संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने नमूद करत याबाबतचा प्रस्तावच विधी समितीपुढे मंजुरीसाठी आणला आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.