Advertisement

हिंदमाता यंदाही तुंबणार!


हिंदमाता यंदाही तुंबणार!
SHARES

परळमधील हिंदमातासह दक्षिण मुंबईतील काही भागांमध्ये पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने सुमारे 100 कोटी रुपये खर्च करून ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन उभारले. मागील वर्षी या पम्पिंग स्टेशनचे लोकार्पण केल्यानंतर हिंदमातासह परिसरात पाणी तुंबणार नाही, असा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. तरीही महापालिका या भागात पाण्याचा निचरा करणारे तब्बल 55 पंप बसवत आहे. पम्पिंग स्टेशन सुरु होऊनही या भागात पाणी तुंबणार ही भीती वाटत असल्यानेच हे पंप बसवले जात आहेत. येथे पाणी तुंबणार हे त्रिकालाबाधित सत्य असून पंप बसविण्यासाठी महापालिकेने खर्च केलेले 100 कोटी रुपये पाण्यात गेल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

मुंबईतील नाल्यांचे रुंदीकरण तसेच खोलीकरण करण्यासाठी महापालिकेने ब्रिमस्टोवॅड प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गतच सखल भागांमध्ये तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पम्पिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. परंतु हाजी अली, इर्ला नाला, क्लिव्ह लँड बंदर, लव्ह ग्रोव्ह आणि ब्रिटानिया आऊटफॉल येथे पम्पिंग स्टेशन उभारण्यासाठी 500 कोटी रुपये खर्च करुनही अनेक भागांमध्ये पाण्याचा उपसा करणारे पंप बसवण्यात येत आहेत. पम्पिंग स्टेशन कार्यान्वित नव्हते, तेव्हा मुंबईभर 266 पंप बसवले जात असत. परंतु 5 मोठे पम्पिंग स्टेशन्स सुरु होऊनही संपूर्ण मुंबईत 310 पंप बसवण्यात येत आहेत. पंपाचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढलेले दिसत आहे.

मागील वर्षी रे रोडवरील ब्रिटानिया आऊटफॉल येथे पम्पिंग स्टेशनचे लोकार्पण करून ते सुरू करण्यात आले. या ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनमुळे रे रोड रेल्वे स्थानक परिसर, दिनशॉ पेरीट मार्ग, हिंदमाता, जीजीभॉय मार्ग, अभ्युदय नगर, सरदार हॉटेल, दत्ताराम लाड मार्ग, मडकेबुवा चौक, लालबाग, काळाचौकी, स्टार सिनेमा, भायखळा स्टेशन (पूर्व), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व आचार्य दोंदे मार्ग जंक्शन या 13 ठिकाणी साचणाऱ्या पाण्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळेल, असे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाने छातीठोकपणे सांगितले होते.

परंतु, याच भागात महापालिकेने साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी तब्बल 55 पाणी उपसा करणारे पंप बसवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन बांधूनही हिंदमातासह दक्षिण मुंबईतील भागांमध्ये पाणी तुंबणारच अशी भीती भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून या भागात जलभराव होणार नाही याचा दिशादर्शक अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे. ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनसाठी 80 कोटी रुपये खर्च केले तरीही या विभागातील पंपाची संख्या कमी न होता वाढली कशी? असा सवाल कोटक यांनी केला.


हेही वाचा

पूर्व उपनगरातील नालेसफाई 100 टक्के हा जोक - भाजपा

पावसाळ्यातही महापालिकेची कामं सुरुच


मागील वर्षी पम्पिंग स्टेशन सुरु झाल्यानंतरही 3 जुलै, 21 जुलै व 5 ऑगस्ट 2016 या कालावधीत हिंदमातासह इतर सर्व भागांमध्ये पाणी तुंबले होते. याचा अर्थ पम्पिंग स्टेशन कार्यान्वित नव्हते किंवा पाणी उपसणाऱ्या पंपांनी काम केले नाही, अशी शंका उपस्थित करत मनोज कोटक यांनी यंदाही येथे पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा केला आहे. पम्पिंग स्टेशन सुरु झाल्यानंतर येथील पंप हाती चालवण्यात आले आहे. मुळात येथील सातही पंप हे स्वयंचलित आहेत. तरीही पहिले दोन महिने ते हाती चालवण्यात आल्याचे कोटक यांनी सांगितले.

स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हिंदमाता परिसराचा भाग हा बशीच्या आकारासारखा खोलगट आहे. त्यामुळे तिथे पाणी तुंबत होते, असे स्पष्ट करत आता ब्रिटानिया पंपिंग स्टेशन सुरु झाल्यामुळे निश्चित या भागात पाणी तुंबणार नाही, असे म्हटले आहे. यंदा खऱ्या अर्थाने हे पम्पिंग स्टेशन योग्य क्षमतेने सुरु होणार आहे. मात्र, तरीही खबरदारीची उपाययोजना म्हणून या ठिकाणी पंप बसवण्याची तयारी केली आहे. परंतु हे पंप बसवल्यामुळे पाणी तुंबणार असे भाकीत कुणी करू नये. जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास या पावसाळ्यात होऊ नये याची खबरदारी सत्ताधारी पक्ष म्हणून आम्ही निश्चित घेत आहोत. त्यावर आमचे लक्ष आहे, असे कोरगावकर यांनी स्पष्ट केले.

कार्यान्वित झालेले पम्पिंग स्टेशन्स -
हाजी अली पम्पिंग स्टेशन : 100 कोटी
इर्ला पम्पिंग स्टेशन : 90 कोटी रुपये
लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशन : 102 कोटी रुपये
क्लिव्हलँड बंदर पम्पिंग स्टेशन : 116 कोटी रुपये
ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन : 120 कोटी रुपये

मागील दहा वर्षांमधील पंपांची संख्या -
सन 2014-15 : पंपांची संख्या : 266 (खर्च :12.02 कोटी)
सन 2015-16: पंपांची संख्या : 292 (खर्च : 13.56 कोटी)
सन 2016-17 : पंपांची संख्या : 313 (खर्च :15.64 कोटी)
सन 2017-17 : पंपांची संख्या : 310 (खर्च: 16.89 कोटी)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा