Advertisement

उपाहार गृहांच्या गच्चीवर 'नो शेड'!

पावसाळ्याच्या काळात किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत देखील उपाहारगृहांच्या गच्चीवर 'शेड' उभारण्याची परवानगी देण्यात येऊ नये. तसेच, ज्या ठिकाणी असे 'शेड' आढळून येतील, ते तात्काळ तोडावेत, असे आदेशही महापालिका आयुक्तांना दिले.

उपाहार गृहांच्या गच्चीवर 'नो शेड'!
SHARES

अनेक उपाहारगृहांच्या गच्चीवर पावसाळ्यात 'शेड' उभारले जाते. हे शेड अग्निसुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते. ही बाब लक्षात घेऊन यापुढे उपाहारगृहांच्या गच्चीवर कोणत्याही प्रकारचे शेड उभारण्यास परवानगी देऊ नये, असे आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.


आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आयुक्तांनी हे आदेश दिले आहेत.

पावसाळ्याच्या काळात किंवा अन्य कोणत्याही परिस्थितीत देखील उपाहारगृहांच्या गच्चीवर 'शेड' उभारण्याची परवानगी देण्यात येऊ नये. तसेच, ज्या ठिकाणी असे 'शेड' आढळून येतील, ते तात्काळ तोडावेत, असे आदेशही महापालिका आयुक्तांना दिले.


पार्टिशन असलेल्या हॉटेलांना नोटीस

उपाहारगृहांमध्ये लाकडी जिने, भिंतीवरील लाकडी आच्छादन किंवा लाकडी 'पार्टिशन' यासारख्या ज्वलनशील बाबी अग्निसुरक्षेच्या दृष्टीने घातक ठरू शकतात. हे लक्षात घेऊन, ज्या ठिकाणी अशा बाबी आढळून येतील, त्याबाबत तात्काळ नोटीस देऊन त्यावर कारवाई करावी, असेही आदेश दिले आहेत.


जिन्यांची रुंदी दीड मीटर आवश्यक

उपाहारगृहांमधील जिन्यांची रुंदी ही नियमानुसार किमान १.५ मीटर असणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी ही रुंदी कमी आढळून येईल, त्याबाबत देखील नियमांनुसार तात्काळ कारवाई करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.


फर्निचर आणि प्लास्टिक दुकानांचीही होणार तपासणी

महापालिका क्षेत्रातील फर्निचरची दुकाने, प्लास्टिक वस्तूंची विक्री करणारी दुकाने, रसायन विक्री करणारी दुकाने यासारख्या ज्वलनशील वस्तूंची विक्री करणा-या किंवा साठा असणा-या आस्थापनांची तपासणी करावी. या तपासणीदरम्यान नियमबाह्य बाबी आढळून आल्यास तात्काळ कारवाई करावी, असेही आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा