Advertisement

मालमत्ता कर थकबाकीधारकांना नवी मुंबई पालिकेच्या नोटिसा, २१ दिवसांची मुदत

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना (abhay yojna) जाहीर करून व त्यास मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांना नोटीस बजाविण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

मालमत्ता कर थकबाकीधारकांना नवी मुंबई पालिकेच्या नोटिसा, २१ दिवसांची मुदत
SHARES

नवी मुंबई महापालिकेच्या (Navi Mumbai Municipal Corporation) मालमत्ता कर (property tax) विभागाने मोठ्या रक्कमेची थकबाकी असणाऱ्या २६ थकबाकीदारांना मालमत्ता जप्त करण्याची नोटीस बजावली आहे. या  थकबाकीदारांनी ५ कोटी रुपयांचा कर थकवला आहे. नोटीस बजावल्यापासून २१ दिवसांच्या आत रक्कम जमा न झाल्यास त्यांची मालमत्ता लिलावात विक्री केली जाणार आहे. 

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी अभय योजना (abhay yojna) जाहीर करून व त्यास मुदतवाढ देऊनही प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांना नोटीस बजाविण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. महापालिकेच्या वतीने अभय योजना जाहीर करून आवश्यक मुदत व थकबाकीवर सवलत देऊनही थकबाकीदार मालमत्ता कर भरण्याकडे दुर्लक्ष करत असतील तर कायदेशीर कारवाई करावी लागेल असं आयुक्तांनी म्हटलं आहे. 

बऱ्याच मालमत्तांबाबत कोर्ट केसेस दाखल केल्या जातात व त्या वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. यामुळे मालमत्ताकर वसूलीवरही परिणाम होतो. त्यामुळे अशा प्रत्येक केसेसचा नियमित आढावा घेऊन त्या निकालात काढण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी मालमत्ता कर विभागासाठी स्वतंत्र लीगल सेल स्थापन करावा असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. 

ऑगस्ट महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोविड सुविधा उभारण्याकरिता लागणारा खर्च लक्षात घेता तसंच कोविड प्रभावी काळात विविध विभागातील कर्मचारी कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवण्याच्या कामात व्यस्त होत असल्याने ३१ जुलैपर्यंत मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसुली व्हावी. त्यातही मोठ्या रकमेच्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी झपाटून कामाला लागण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी मालमत्ता कर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

मोठ्या रकमेच्या थकबाबकीदारांपासून कमी रक्कमेच्या थकबाकीदारांपर्यंत उतरत्या क्रमाने यादी तयार करून प्राधान्याने मोठ्या रक्कमेच्या थकबाकीदारांपासून सुरूवात करीत त्यांना कायदेशीर नोटीस बजाविणे व पुढील कारवाई करणे याबाबतची प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याची सूचना आयुक्तांनी केली आहे. 



हेही वाचा - 

कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरण प्रकरणाची होणार सखोल चौकशी

माजी एनकाऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा NIAच्या ताब्यात, चौकशी सुरू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा