Advertisement

रक्त चाचणी, सिटी स्कॅनसह सर्व वैद्यकीय चाचण्या होणार स्वस्त


रक्त चाचणी, सिटी स्कॅनसह सर्व वैद्यकीय चाचण्या होणार स्वस्त
SHARES

सिटी स्कॅॅन असो वा रक्त चाचणी, प्रत्येक रूग्णालयात अथवा पॅथालाॅजी लॅबमध्ये त्यासाठी वेगवेगळे दर आकारले जातात. रूग्णांकडून भरमसाठ पैसे घेऊनही अचूक निदान मिळेल याची काही खात्री नसते. त्यामुळे एकीकडे रुग्णाची आर्थिक लूट तर होतेच, पण अचूक निदान न झाल्याने त्यांच्या जीवालाही धोका उत्पन्न होतो. मात्र यापुढे या दोन्ही गैरप्रकारांना खीळ बसणार आहे. केंद्र सरकारने आरोग्य चाचण्या आणि वैद्यकीय प्रक्रियांच्या दरांवर नियंत्रण आणण्याचा निर्णय घेतल्याने रूग्णांना स्वस्तात आणि अचूक वैद्यकीय चाचण्या उपलब्ध होणार आहेत.

केंद्राने सर्व राज्यांकडून मागवले दर -
केंद्र सरकाने सर्व राज्य सरकारांना पत्र लिहित तेथील आरोग्य चाचण्या आणि वैद्यकीय प्रक्रियांचे जास्तीत जास्त तसेच कमीत कमी दर नमूद करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे लॅब-रूग्णालयांतील पायाभूत सुविधांची माहितीही मागवली आहे. या माहितीच्या आधारे चाचण्या तसेच वैद्यकीय प्रक्रियांचे दर निश्चित करत हेच दर सर्वत्र लागू करण्याचा केंद्राचा विचार असल्याची माहिती महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे सदस्य डाॅ. शिवकुमार उत्तुरे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे.

चुकीच्या निदानामुळे रुग्णांच्या जीवाला धोका -
औषधे स्वस्त आणि गुणकारी असलीच पाहिजेत. पण त्याचवेळी रोगाचे निदानही अचूक होणे गरजेचे असते. रोगाच्या निदानावरच रूग्णाला उपचार दिले जातात. निदानच जर चुकीचे असेल, तर चुकीच्या उपचारांमुळे रुग्णाचे आरोग्यही धोक्यात येईल. आतापर्यंत या बाबीकडे दुर्लक्ष होत होते. मात्र केंद्राने या प्रश्नाकडेही गांभीर्याने लक्ष दिल्याने आरोग्य क्षेत्राकडून केंद्राच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

ग्रेडनुसार दर आकारणी ठरवावी-
केंद्राकडून यासंबंधीचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या राज्यात सर्वत्र आरोग्य चाचण्यांसाठी एकच दर लागू होणार असल्याने रूग्णांना मोठा दिलासा मिळेल. मात्र हा निर्णय प्रत्यक्षात कसा आणणार आणि तो व्यवहार्य ठरेल का? असे प्रश्नही काही तज्ज्ञ उपस्थित करत आहेत. आरोग्य चाचण्यांचे निदान अचूक होण्यासाठी त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधा आणि यंत्रणाही दर्जेदार असणे गरजेचे आहे. महागडे तंत्रज्ञान आणि चाचण्यांचा अहवाल देणारे प्रशिक्षित डाॅक्टर यांच्याकडून केलेल्या चाचण्या आणि त्यांचे अहवाल रुग्णांना कमी किमतीत उपलब्ध करुन देणे शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारने सरसकट दर निश्चित न करता ग्रेड ठरवली पाहिजे, अशी मागणी डाॅ. उत्तुरे यांनी केली आहे. ग्रेडनुसार संबंधित रुग्णालये, लॅबमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा-यंत्रणा आणि तंत्रज्ञांच्या उपलब्धतेवर त्याचे दर निश्चित करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र असोसिएशन आॅफ प्रॅक्टिसिंग पॅथालाॅजिस्ट अॅण्ड मायक्रोबायोलाॅजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डाॅ. संदिप यादव यांनी या निर्णयाचे स्वागत करतानाच अनेक शंकाही उपस्थित केल्या आहेत. बोगस पॅथालाॅजी आणि बोगस पॅथालाॅजिस्टविरोधात कारवाई केल्यास निम्म्याहून अधिक प्रश्न सुटतील. त्यामुळे सर्वात आधी मुळावर घाव घालावा, अशी मागणी डाॅ. यादव यांनी केली आहे. तर डाॅ. उत्तुरे यांच्याप्रमाणेच डाॅ. यादव यांनीही हा निर्णय व्यवहार्य ठरवा यासाठी ग्रेडनुसार चाचण्या तसेच वैद्यकीय प्रक्रियांची दरनिश्चिती करण्याची मागणी केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा