Advertisement

मुंबईतील भटक्या कुत्र्यांमध्ये बसवणार मायक्रो चिप


मुंबईतील भटक्या कुत्र्यांमध्ये बसवणार मायक्रो चिप
SHARES

मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. परंतु कोट्यवधी रुपये खर्च करून राबवण्यात येणाऱ्या या नसबंदी कार्यक्रमानंतरही मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे नसबंदीच्या या मोहिमेवरच शंका उपस्थित होत आहे. नसबंदी केलेल्या आणि रेबीज प्रतिबंधक लस दिलेल्या कुत्र्यांची माहिती त्वरित उपलब्ध व्हावी, यासाठी आता निर्बीजीकरण केलेल्या श्वानांमध्ये मायक्रो चिप बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून याबाबत लवकरच निविदा मागवण्यात येणार आहेत.

मुंबईत 26 जानेवारी 1994 पासून भटक्या कुत्र्यांचा उपद्रव नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्यावर निर्बीजीकरण आणि लसीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मात्र, 2014 मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना केली असता मुंबईत 95 हजार भटके कुत्रे आढळून आले. यामध्ये 69 हजार 239 इतक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले असल्याचे आढळून आले. तर 25 हजार 935 कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले नसल्याची बाब समोर आली होती. सन 1998 पासून पूर्वी अहिंसा, आयडीए, बीएसपीसीए, डब्ल्यूएसडी या 4 अशासकीय संस्थांमार्फत निर्बीजीकरण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. परंतु 2016 पासून यूएव्हीए आणि उत्कर्ष स्टार मित्र मंडळ या दोन नवीन अशासकीय संस्था अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. नियमित गाड्यांचा पुरवठा आणि दोन नवीन संस्थांची मदत यामुळे सन 2016 मध्ये निर्बीजीकरणाची संख्या 11 हजार 929 पर्यंत वाढली आहे. त्यामुळे सेक्टोरल पद्धतीनुसार कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवले जाईल, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 

या निर्बीजीकरण कार्यक्रमासाठी कुत्रे पकडणाऱ्यांसहित वाहने चालू करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, यात दोन संस्था पात्र ठरल्या आहेत. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर ही वाहने चालू करण्यात येतील. त्यानुसार भटके कुत्रे पकडण्याच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांच्या शरीरात चिप बसवण्यात यावी जेणेकरून निर्बीजीकरण केलेले कुत्रे ओळखता येतील, अशाप्रकारे उपाययोजना राबवण्यात येत आहे. चिप बसवणे ही अत्याधुनिक पद्धत असल्यामुळे नसबंदी आणि रेबीज लस आदींची माहिती प्राप्त होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. सन 2017 पासून कुत्र्यांची नसबंदी कार्यक्रम हा देवनार महाव्यवस्थापक यांच्याकडे सोपवण्यात येत आहे.

भटक्या कुत्र्यांचा नसबंदीची जबाबदारी आमच्या विभागाकडे देण्याचा प्रस्ताव आहे. पण त्याला अद्यापही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. भटक्या कुत्र्यांची नसबंदी आणि त्यांना दिली जाणारी रेबिजची लस याची माहिती घेण्यासाठी कुत्र्यांमध्ये मायक्रो चिप बसवण्याची अत्याधुनिक पद्धत आहे. या पद्धतीचा अवलंब करण्याचा विचार सुरू आहे.
डॉ. योगेश शेट्ये, महाव्यवस्थापक, देवनार पशुवधगृह

सध्या निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांची ओळख पटवण्यासाठी ज्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे, त्या कुत्र्यांच्या कानाचे टोक 'व्ही' आकारात कापण्यात येते. 

भटक्या कुत्र्यांची माहिती

मुंबईतील 2014 मधील भटक्या कुत्र्यांची संख्या - 95,175
जानेवारी 2014 पर्यंत नसबंदी केलेले भटके कुत्रे - 69,239
नसबंदी न झालेल्या कुत्र्यांची संख्या - 25,935
वार्षिक नसबंदीचे उद्दिष्ट - 8 हजार
तीन वर्षातील नसबंदीवरील खर्च - सुमारे 1 कोटी रुपये

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा